पाण्याचा गंभीर प्रश्न : सात तालुक्यांना वणवण भटकावे लागणार
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये अवघा 8.5 टीएमसी (27.78 टक्के) पाणीसाठा शिल्लक असल्याने पुढील 4 महिन्यांचे पाण्याचे नियोजन कसे होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांना पडला असून, एप्रिल आणि मेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. प्रथमच दुष्काळी परिस्थितीमध्ये पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील 7 तालुक्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे, अशी चिन्हे पाण्याच्या नियोजनाअभावी दिसू लागली आहेत.
कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार 6.2 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र प्रत्यक्षात 10.66 टीएमसी पाणी सोडण्यात आले. 25 वर्षात प्रथमच 62 दिवसानंतर आवर्तन सोडण्यात आल्याने यावर्षी उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीला पाणी मिळणार नसल्याने शेतकर्यांचे यावर्षीचे नियोजन कोलमडून जाणार आहे. शेतीला पाणी नसले तरी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
नियोजनाअभावी पाणी टंचाई
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतकुकडी प्रकल्पातून 20 ऑक्टोबरपासून नदीद्वारे आणि 25 ऑक्टोबर 2018 पासून कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर कालवा समितीची 16 ऑक्टोबर 2018 रोजी दुसरी बैठक होऊन जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. 55 दिवसाचे आवर्तन सोडण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्ष 62 दिवसानंतर पाणी बंद करण्यात आल्याने इतक्या मोठ्या आवर्तनात 10.66 टीएमसी पाणी सोडण्यात आले. 4.46 टीएमसी पाणी जादा सोडण्यात आल्याने आता धरणात अवघे 8.484 टीएमसी पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणीसाठा डिंभे धरणात शिल्लक आहे. या धरणात 5.072 टीएमसी पाणी साठा आहे. 15 जानेवारीपासून या धरणातून डिंभा डावा कालव्यातून येडगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या नियोजनाअभावी प्रथमच जुन्नर तालुक्यांसह आंबेगाव, शिरूर आणि पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा या तालुक्यांना
पिण्याच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्रकल्पातील पाच धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी
सध्या येडगाव धरणात 0.756 टीएमसी, वडज धरणात 0.314 टीएमसी, माणिकडोह धरणात 1.314 टीएमसी, पिंपळगाव जोगा 1.029 टीएमसी, डिंभा धरणात 5.072 टीएमसी असे एकूण 08.484 टीएमसी पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी आज अखेर 18.992 टीएमसी (62.19 टक्के) पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 34.41 टक्के पाणी कमी आहे.