कुख्यात आप्प्या शेख टोळीचा म्होरक्या जेरबंद

0

डोंबिवली। ठाणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलेला कुख्यात आप्प्या शेख टोळीचा म्होरक्या मौलाली उर्फ जाकीर उर्फ आप्प्या बाबुलाल शेख (27) या गुंडाला क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने जेरबंद केला. पकडण्यासाठी गेलेल्या पथकाला तब्बल अर्धा तास या गुंडाशी झटापट करावी लागली होती.

हा गुंड शुक्रवारी सकाळी तो राहत असलेल्या कोपर स्टेशन जवळील आयरे गावातील सहकार नगर झोपडपट्टीत येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना मिळाली होती. त्यानुसार सपोनि विजय खेडकर, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत आणि हरिचंद्र बंगारा या पथकाने सकाळी 7 वाजल्यापासून बालाजी गार्डनजवळ सापळा लावला होता. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आप्प्या शेख दबक्या पावलांनी तेथे आला.

पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या गुंडाने तेथून धूम ठोकली. झोपडपट्टीतील गल्ल्या-गल्ल्यांतून पळणार्‍या या गुंडांची पोलिसांनी थरारक पाठलाग करून जागीच गठडी वळली. नेहमी हत्यार जवळ बाळगणार्‍या या गुंडाकडे अंगझडतीत कोणतेही हत्यार आढळून आले नाही. या प्रकरणी हवालदार दत्ताराम भोसले यांच्या फिर्यादीनुसार डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.