कुख्यात गुंड गुड्डयाची धुळ्यात निर्घृण हत्त्या

0

धुळे। महापालिका करवसूली विभागाच्या अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी, खून आणि चोर्‍या, किडनॅपिंग, जाळपोळ, खंडणी यासह विविध गंभीर 35 गुन्ह्यातला संशयित रफिकोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा शहरात आज मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निर्घृण खून झाला. वर्दळीच्या पारोळा रोडवर असलेल्या कराचीवाला खुंटाजवळ गोपाल टीसमोर ही थरारक घटना घडली. दरम्यान या खूनाची माहिती धुळ्यात एक क्षणात वार्‍यासारखी पसरली होती.काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात गुड्डयाचा जामिन झाला होता. त्यामुळे तो शहरात बिनधास्तपणे वावरताना दिसत होता. आठवड्यापासून शहरातल्या विविध भागात बुलेटवरची त्याची स्वारी चर्चेचा विषय ठरली होती. विविध गुन्ह्यातून त्याने रग्गड पैसा कमविल्यामुळे त्याचे राहणीमानही उंचावले होते. जळगाव, नगर, नाशिक, मुंबई अशा ठिकठिकाणी त्याचे कनेक्शन असल्यामुळे आणि तेथील वादातून तो अनेक टोळ्यांच्या हिटलिस्टवर होता. अशात आज पहाटेच्या सहाच्या सुमारास तो गोपाल टी हाऊसवर आला आणि मारेकर्‍यांच्या हल्ल्यात बळी पडला.

गुड्डयावर विविध ठिकाणी 35 गुन्हे दाखल
मयत गुड्डयावर जिल्ह्यात तसेच जळगाव, अमळनेर, कोपरगाव, शिर्डी, मध्यप्रदेश या ठिकाणी दरोडा, चोर्‍या मार्‍या, खून, चेन सकॅचिंग आशा अनेक गुन्ह्याच्या 35 गुन्हे दाखल असून मनपा जळीत कांडाचा मुख्यसूत्रधार असल्याने धुळे पोलिसांनी त्याला तडीपार केले होते.

गँगवार होण्याची शक्यता
गुड्डयाच्या झालेल्या खुनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन गटात गँगवॉर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त लावला होता. दोघी पार्ट्या सराईत गुन्हेगार असून शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

रपेट मारण्याची होती सवय
पहाटे पाचला त्याला रपेट मारण्याची सवय होती. नंतर तो गोपाल टी हाऊसवर चहा पीत असताना इंडिका कारमधून तीन ते चार जण व मोटारसायकलवरून काही जण, असे मिळून दहा ते बारा मारेकरी टी हाऊसजवळ आले. मारेक-यांनी गुड्ड्या हॉटेलमधून खेचून बाहेर काढले. कारमधील एकाने त्याच्यावर गोळी झाडली. नंतर गुड्ड्या शेजारील गोपाल हाऊसजवळील एका गल्लीत बचावासाठी पळाला. इंडिका कारमधील तीन ते चार संशयितांसह अन्य मारेक-यांनी त्याला पुन्हा पकडले. आणि गोपाल टी हाऊस समोरच रस्त्यावर आणले. तेथे धारदार शस्त्राने गुड्ड्याच्या मानेवर खोलवर वार केली. शिवाय दोन गोळ्याही गुड्ड्यावर झाडल्या. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नंतर कारमधील संशयित व अन्य मारेकरी हे आग्रा रोडवरून पसार झालेत. वर्दळीच्या रस्त्यावर हा थरार घडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. तरी घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने 7 ते 8 मारेकर्‍यांची ओळख पटली असून एलसीबीने चंद्रमणी चौकातून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी 5 टीम तयार करून जिल्हा व जिल्ह्याबाहेर रवाना केले आहे. त्यात शहर पोलीस स्टेशन 2 एलसीबी 2 तर डीवायएसपी 1 या पथकांचा समावेश आहे.

संशयित मारेकर्‍यांच्या शोधात पोलीस
धुळे पोलिसांनी हस्तगत केलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून संशयित मारेकरी 5 जणांची नावे समोर आली आहेत. त्यात पापा गोयर ,शाम गोयर, भुर्‍या, भद्रा, विकी गोयर या संशयितांच्या तपासावर पोलीस असून वरील सर्व धुळ्याचे रहिवासी असून सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर देखील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रईसउद्दीन शेख उर्फ गुड्डया हा एक सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर विविध पोलीस स्टेशन मध्ये 35 गुन्हे दाखल होते. त्याचा ज्या लोकांनी खून केला आहे त्या संशयितांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून पोलिसांचे विविध 5 पथक मारेकर्‍यांच्या शोधात असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. मारेकरी हेदेखील सराईत गुन्हेगारी पर्शवभूमीचे असून त्यांच्यावर ही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. गुन्ह्याची तपासणी करून मोक्का लावण्याची कारवाई केली जाणार आहे.
विवेक पानसरे,
अप्पर पोलीस अधीक्षक