कुटूंबियांचा जिल्हा रूग्णालयात आक्रोश

0

जळगाव। मेहरुण तलावात पोहण्यासाठी शनिवारी बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा दुपारी 3.30 वाजता बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यातच त्यांच्या कुटूंबियांना रात्री जळगावात येण्यासाठी शनिवारी रात्री उशिर झाल्याने रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यावेळी दोघींच्या कुटुंबियांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात मनहेलवणारा आक्रोश केला. यावेळी नातेवाईकांसह विद्यार्थ्यांनीही गर्दी केली होती.

दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह तलावाबाहेर काढले
बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी भूषण प्रकाश पाटील (वय 21, रा. सुरत), निखील विजय पाटील (वय 20, रा. नंदुरबार), मयूर लोटन गोसावी, चैतन्य पटेल (वय 19, रा. नंदुरबार), अंकूर दिलीप सूर्यवंशी हे शनिवारी सुटी असल्याने पोहण्यासाठी मेहरूण तलावात गेले होते. त्यावेळी भूषण पाटील आणि निखील पाटील हे तलावातील खोल पाण्यात गेल्यानंतर त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांचे मृतदेह तलावाबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते.

का गेला तु पाण्यात…
‘तुला पाण्यापासून लांब राहायला सांगितले होते, का गेला तु पाण्यात’…, ‘आता मला पप्पा कोण म्हणणार असा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश निखीलचे वडील विजय पाटील यांनी केला. तर भूषणच्या आई, वडीलांना भोवळ आल्याने ते खाली पडले होते. एसएसीबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सिव्हीलमध्ये गर्दी केली होती. सकाळी 8.30 वाजता शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रुग्णवाहिकेने दोघांचे मृतदेह नंदुरबार येथे घेऊन गेले.