जुना खेडी रोड परिसरातील देविदास नगरातील घटना ; 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास
जळगाव- कुटूंबिय घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना आतून बंद असलेल्या बेडरुमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बेडरुममधील कपाटातील सोन्या, चांदीच्या दागिण्यांसह 40 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 3 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास जुना खेडी रोड परिसरात समोर आली आहे. चोरट्यांनी अलगदपणे खिडकीतून हात टाकून दरवाजाचा कडी उघडून चोरी केली, अन् परततांना बाहेरुन कडी लावून चोरटे पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याच घराच्या मागील बाजूस तीन दिवसांपूर्वी चोरीची घटना ताजी असून पुन्हा चोरी करुन चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.
शहरातील जुना खेडी रोड परिसरातील देविदास नगरात युवराज अशोक नेहते वय 40 हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. एमआयडीसी परिसरातील पॉलीमर कपनीत मजूर म्हणून कामाला असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवितात. रविवारी रात्री जेवणानंतर युवराज नेहते व व कुटुंबिय 10.30 वाजता हॉलमध्ये झोपले होते. घराचा मुख्य दरवाजा तसेच बेडरुमच्या मागील बाजूच्या दरवाजाला आतून कडी लावली होती.
चोर पावलांनी चोरट्यांनी लांबविला एैवज
चोरट्यांनी बेडरुमच्या मागील बाजूच्या खिडकीतून हात टाकून आतून बंद असलेला दरवाजा उघडला. कुठलाही आवाज न करता कपाटाचे कुलूप तोडले व त्यातील दीड तोळ्याची 30 हजार रुपयांची सोन्याची पोत, दहा ग्रॅमचे कानातले 25 हजार रुपयांचे तीन कर्णफुले, 1 ग्रॅमचे 8 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 2 ग्रॅमचा नेकलेस, 20 ग्रॅमचे पैजण असे 800 रुपयांचे चांदीचे दागिणे, व 40 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 3 हजार रुपये 800 रुपयांचा एैवज लांबविला. पहाटे चार वाजता नेहते यांच्या पत्नी उठल्या असता, त्यांना बेडरुममध्ये सामान अस्ताव्यस्त तर खोलीला बाहेरुन कडी लावलेली असल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यावर नेहते त्यांनी शनिपेठ पोलिसांना संपर्क साधला. शनिपेठ कर्मचार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी युवराज नेहते यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.