उरण । राज्याच्या मंत्रिमंडळातील अर्धे अधिक मंत्री आमच्या घरच्या सटीला आणि लाठ्यालादेखील येऊ शकतात, अशी शेखी मिरवणार्या उरणमधील भाजपच्या नेत्यांना मागील दोन वर्षांपासून उरण नगरपरिषदेला साधा कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळवून देता आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. उरण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संदीप खोमणे यांच्याकडे असलेल्या प्रभारी मुख्याधिकारी पदानेच नगरपरिषदेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे भरकटलेल्या उरण शहरास कुणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देता का, असा मिस्कील टाहो शहरवासीयांकडून फोडला जात आहे. विशेष म्हणजे शहराच्या कारभाराशी फारसे काही देणेघेणेच नसल्यासारखे कारभार हाकणार्या प्रभारी मुख्याधिकारी संदीप खोमणे यांनी मागील दीड-दोन वर्षांच्या आपल्या कारभारात एखाद्या तरी अनाधिकृत बांधकामावर हातोडा चालवला किंवा त्यांच्या नजरेस चटकन भरू शकणार्या तहसील कचेरीला लागून असलेल्या एखाद्या तरी अनधिकृत टपरीवर कारवाई केली, असे एकही उदाहरण नसल्याने शहरात चाललेल्या कोट्यवधीच्या कामांवर केवळ सहीचे धनी असलेले मुख्याधिकारी संदीप खोमणे यांच्या जागेवर शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणारा, असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
धाव मारली तर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत अवघे शहर फिरून होईल, असे उरण शहर आहे. मात्र, या शहराला मागील दीड ते दोन वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारीच नाही. त्यामुळे कॅप्टनशिवाय जहाज चालावे तसा शहराचा कारभार चालवला जात आहे. शहरात मागील सुमारे महिनाभरापासून रस्ते सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, त्याबाबत योग्य नियोजन नसल्याने शहरवासीयांना सतत वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या कोणत्याही कामाबाबत प्रभारी मुख्याधिकारी खोमणे यांना काही देणे घेणेच नसावे असेच चित्र शहरात असल्याने शहराच्या दुरुस्तीने चांगले म्हणून ओळखले जाणारे हे कामदेखील टीकेचा विषय ठरत आहे. कोणत्याही प्रकारचा नियोजनाचा अभाव असल्याने कामाच्या ठिकाणी असलेली खडी अस्ताव्यस्त पडणे, सिमेंटीकरण झालेल्या कामाच्या बाजूच्या रस्त्यावर पाणी साचणे, कामाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणाला कोणीही नसणे, काम सुरू झाल्याचा आणि ते समाप्त होण्याच्या कालावधीची माहिती देणारा कोणताही फलक या ठिकाणी लावला गेलेला नाही, अशा सर्वच बाबतीत शहरात गोंधळ सुरू आहे.
अंदाधुंदी कारभाराला आळा बसेल
याव्यतिरिक्त आधीच अरुंद रस्ते आणि त्यातही फेरीवाल्याची रस्तोरस्ती असलेली दादागिरी, रस्त्यावर लागणार्या हातगाड्या, बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर, अशा प्लास्टिक पिशव्याच्या पुरवठा दारावर कारवाई करण्यात केली जाणारी कुचराई आदी सर्व पाहता केवळ सहीच्या धनी असलेल्या प्रभारी मुख्याधिकार्याऐवजी शहराला स्वतःचा कायमस्वरूपी खमक्या मुख्याधिकार्याची गरज आहे. मात्र, शहराच्या कारभारात दखल देईल, असा कोणी आला तर आपल्या अंदाधुंदी कारभाराला आळा बसेल, अशी शक्यता असल्याने राज्याच्या कारभारात आपले खूप वजन असल्याच्या बाता मारणारे कोणीही उरण शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी काम करताना दिसत नसल्याचे चित्र उरणमध्ये आहे.