कुत्र्याला वाचविण्याच्या नादात अपघात, दोघे ठार

0

पुणे-नाशिक महामार्गावरील अवसरी खुर्दजवळील दुर्घटना

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मंचरजवळ असलेल्या अवसरी खुर्द येथे भरधाव जाणार्‍या कारचालकाने अचानक पुढे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याचा केलेला प्रयत्न जीवावर बेतला आहे. कार थेट 50 फूट खोल ओढ्यात कोसळून दोघा जणांचा जागीच बळी गेला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे 5 वाजता ही दुर्घटना घडली असून, जखमींना मंचर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बबन निवृत्ती तिडके (वय 52, रा. कसबे, ता. निफाड) व रमेश नामदेव सोनवणे (वय 58, रा. खेडगाव, ता. दिंडोरी) अशी मृतकांची नावे असून, तिडके हे पोलिस कर्मचारी आहेत. तर वाघ हे द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ व शिवनेरी येथून शिवज्योत घेऊन जाणारे शिवप्रेमी यांनी मोबाईलच्या प्रकाशात गाडीत अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले असता, दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर निवृत्ती काश्मिरे आणि ज्ञानेश्वर वाघ या जखमींवर उपचार सुरु होते.

कार थेट 50 फूट खोल ओढ्यात कोसळली
पुण्यातील काही कामे उरकून चौघेजण खासगी आयटेन या कारने नाशिककडे जात होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तांबडेमळा-भोरवाडी येथे रस्त्यावर अचानक समोरून कुत्रे आले. त्याला वाचविण्याच्या नादात वाहनचालक रमेश सोनवणे याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्यालगतचे दुभाजक आणि लोखंडी बोर्ड तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या 50 फूट खोल ओढ्यात कोसळली. शेवटी झाडाला धडकून ती अडकली. यावेळी भीषण आवाज झाला होता. हा आवाज ऐकून ग्रामस्थ व शिवप्रेमी तरुण तातडीने धावले, त्यांनी मोबाईलच्या उजेडात गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. तथापि, चालक रमेश सोनवणे व पोलिस कर्मचारी बबन तिकडे हे जागीच ठार झाले होते. सोनवणे यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार असून, तिडके यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दोघांचेही शवपरीक्षण करून दुपारच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघाताची फिर्यात ज्ञानेश्वर वाघ यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.