कुरकुंभ एमआयडीसी गतीरोधकाची अवस्था दयनीय

0

यवत । पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथील एमआयडीसी सर्व्हीस रोडवर कुरकुंभ चौकालगत असणार्‍या रबरी गतीरोधकाची अवस्था दयनीय झाली आहे. वाहनांचा वेग कमी होण्यासाठी कुरकुंभ चौकात रबरी गतीरोधक बसवण्यात आले होते. हे रबरी गतिरोधक रस्त्यावर खिळ्यांच्या सहाय्याने बसविण्यात आले होते. हे खिळे निम्मे रस्त्याच्या खाली आणि निम्मे रबरी गतिरोधकमध्ये असतात. हे गतिरोधक बसवून बराच काळ उलटल्याने त्यांची अवस्था आता खूप बिकट झाली आहे. जड वाहने ये-जा करून हे गतिरोधक चपटे होतात. यामुळे गतिरोधक खाली जातात व खिळे वर येतात. वर आलेले खिळे वाहनाच्या टायरमधे गेल्यामुळे वाहनांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या गतिरोधकांच्या क्षमतेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण होत आहे.

अपघाताची शक्यता
कुरकुंभ चौकात विनाकारण वाहनांची गर्दी होते. त्याचबरोबर एमआयडीसी चौकात उड्डाण पूल नसल्यामुळे येथील कामगार दुचाकी, जड वाहनांना कुरकुंभ चौकातून उलट दिशेने जात असतात. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. कुरकुंभ चौक तसेच हायवे क्रॉसिंगवरील सर्वच गतिरोधक खराब झाल्याने अपघात होऊ शकतात. याला आळा बसावा यासाठी कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी टोलनाक्याच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. येथे गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. अपघात टाळण्यासाठी आम्ही त्याची लवकरात लवकर दखल घेऊन हे काम करू असे पाटस टोल देखभाल व्यवस्थापक डी. एस. पाटोळे यांनी सांगितले.