कुर्‍हे पानाचे गावातील युवतीची आत्महत्या : युवकाविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : कुर्‍हेपानाचे गावातील लग्न निश्चित झालेल्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. भावी पतीकडून मारले जात असलेल्या टोमण्याला कंटाळून युवतीने हे पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्यांनी करीत थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी भूषण ज्ञानेश्वर पाटील (रा.नाशिक, मूळ रा.रावेर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुका पोलिसात गुन्हा
कुर्‍हा येथील रहिवासी रवींद्र नागपुरे यांची मुलगी रामेश्वरी (24) हिचे लग्न रावेर येथील भूषण ज्ञानेश्वर पाटील या युवकाशी निश्चित झाले होते मात्र युवक मोबाईलवरून युवतीस नेहमीच तु गावंढळ आहेस, तु जाड आहे असे टोमण मारून हिणवत होता. या सर्व प्रकाराला रामेश्वरी कंटाळली आणि तिने घरी आई-वडील नसतांना गळफास घेत 25 मार्चला सायंकाळी 5.30 पूर्वी आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी पोलिस स्टेशनला जात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी टाळाटाळ केली होती मात्र मुलीचे वडील आणि समाज बांधवांनी पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.