मुक्ताईनगर – टंचाईच्या पार्श्वभूमीवर विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव दडवून ठेवल्याने मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेचे अव्वल कारकून तथा कुर्हाचे प्रभारी मंडळ अधिकारी एम.बी.तीर्थकर यांना निलंबित करण्यात आल्याने कामचुकार कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी 9 एप्रिलच्या जळगावातील बैठकीत हा मुद्दा मांडला होता. तीर्थकर यांच्या निलंबनाच्या वृत्तास प्रभारी तहसीलदार मनोज देशमुख यांनी दुजोरा दिला. गेल्या 9 एप्रिल रोजी जळगाव येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली होती. त्यात आमदार खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंडळाधिकारी तीर्थकर यांच्याकडे मंजुरीसाठी पडून आहेत, असा आक्षेप घेतला होता. या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना तीर्थकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.