जळगाव। जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येत असलेला शालेय पोषण आहारातील धान्य निकृष्ट दर्जाचा असल्याचे 15 दिवसापूर्वी आढळून आहे अद्यापही शाळांना निकृष्ट दर्जाचाच पोषण आहार पुरविला जात आहे. जिल्ह्याभरात निकृष्ट पोषण आहार प्रकरण गाजत असतांना पुरवठादाराकडून सर्रासपणे निकृष्ट धान्य पुरविण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी 15 रोजी पुरवठादाराने भुसावळ तालुक्यातील कुर्हा येथील शाळेला धान्य पुरवठा केला. नव्याने पुरवठा केलेला धान्यादीही निकृष्ट असल्याचे आढळून आले. वाटाणे, मटकी वगळता इतर डाळी निकृष्ट असल्याने मुख्याध्यापकांनी संबंधीत प्रकाराची माहिती कुर्हा गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांना कळविली. सावकारे यांनी लेखी घेण्याचे आदेश दिल्याने मुख्याध्यापकांनी पुरवठादाराकडून डाळ निकृष्ट असल्याचे लेखी लिहून घेतले आहे.
पुरवठादाराला राजाश्रय
विशेष राजाश्रयामुळे जिल्हाभरात बोगस धान्य पुरवून देखील ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पुरवठादारावर राजकीय वरदहस्त असल्याचे दिसून येते. राजकीय पाठबळ असल्यानेच पुरवठादाराला वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शालेय पोषण आहाराचा विषय गाजवला. सभागृहाची भावना लक्षात घेऊन ठेकेदाराचा ठेका रद्द करणे आणि या योजनेची सीआयडी चौकशी करण्याचा ठराव देखील सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
हा प्रकार थांबेल कधी?
गेल्या दोन आठवड्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी भुसावळ तालुक्यातील आणि माधुरी अत्तरदे यांनी धरणगाव तालुक्यातील काही शाळांची तपासणी केली असता त्यांना निकृष्ट पोषण आहार धान्यांदी आढळून आले. जिल्हाभरातील 13 शाळांमध्ये निकृष्ट धान्य आढळून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. तक्रारदारांनी तात्काळ त्यांनी सीईओं, शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती यांच्याकडे चौकशीची मागणी करत तक्रार केली. मात्र दोन आठवडे उलटले असून अद्यापही शाळांना चांगल्या दर्जाच्या पोषण आहार पुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल आहे. हा प्रकार कधी थांबेल? प्रशासनाचा पुरवठादारावर वचक राहिला नाही असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
लेखी लिहून घेत उतरविले धान्य
पुरवठादाराने लेखी पत्रात नवीन चांगल्या प्रतिची डाळ उपलब्ध करुन देऊ असे सांगत शाळेत धान्य ठेवून घेण्याचे सांगितले. नवीन चांगल्या प्रतिची डाळ देण्यात येत नाही तोपर्यत पुरवठादाराला देयक रक्कम मिळणार नसल्याचे लेखी घेण्यात आले आहे. तसेच पुरवठादाराने मोठ्या वाहनात धान्याचा पुरवठा न करता छोट्याश्या चारचाकी वाहनाद्वारे धान्यांदीचा पुरवठा करत आहे. पाच-पाच किलोच्या गोण्यातून धान्यांदीचा पुरवठा ठेकेदाराकडून होत असल्याचे यावेळी दिसून आले. जिल्हाभरात अशीच परिस्थिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.