कुर्‍हा-हरदो शिवारात बिबट्या चढला झाडावर

0

जमावाच्या गर्दीमुळे बिबट्या बिथरला ; शेतमजूरावर केला हल्ला

भुसावळ- बोदवड तालुक्यातील कुर्‍हा-हरदो शिवारातील बिबट्या थेट झाडावर चढल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शेकडो नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. जमावाच्या गोंगाटामुळे बिबट्याने झाडावरून उडी मारत पळ काढला मात्र बिथरलेल्या बिबट्याने शेतात काम करीत असलेल्या एका शेतमजुरावर हल्ला चढवल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांची धाव
कुर्‍हा-हरदो भागात बिबट्याने झाडावर उडी घेतल्याची माहिती मिळताच वनविभागाचे सब डीएफओ एस.आर.पाटील व वनपाल डी.एम.कोळी यांच्यासह वनकर्मचार्‍यांनी धाव घेत जमावाला पांगवले. जमावाच्या गोंगाटामुळे तासभर झाडावर थांबलेल्या बिबट्याने अचानक झाडाखाली उडी घेत पळ काढला. सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका शेतातील मजुराने बिबट्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर वनकर्मचार्‍यांनी बिबट्यावर पाळत ठेवली असून जमावाला हटवण्यासह बिबट्याला जंगलात सोडेपर्यंत आम्ही तळ ठोकून राहणार असल्याचे सब डीएफओ एस.आर.पाटील म्हणाले. दरम्यान, काही अंतरावरच बुलढाण्याच्या जंगलाची सीमा सुरू होत असल्याने बिबट्या त्या भागातही जाण्याची शक्यता आहे.