भुसावळ : शौचासाठी जाणार्या 65 वर्षीय वृद्धाला भरधाव डंपरने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकासही अटक करण्यात आली. प्रल्हाद तुळशिराम पाटील (65, कुर्हेपानाचे) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
अपघातानंतर डंपर चालक पसार
प्रल्हाद तुळशिराम पाटील (65, कुर्हेपानाचे) व त्यांचा मुलगा किशोर हे सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शौचास जात असताना कुर्हेपानाचे गावाजवळील कुर्हे-बोदवड रस्त्यावरील मारोती मंदिरापुढे कुर्हे गावाकडे येणारा भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.4427) ने धडक दिल्याने प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. ग्रामस्थांनी यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघात प्रकरणी किरण प्रल्हाद पाटील (कुर्हेपानाचे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डंपर चालक मयूर गंगाधर फालक (साकेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस तालुका पोलिसांनी अटक केली असून अपघातास कारणीभूत ठरणारा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.