इस्लामाबाद : भारतीय नागरिक व नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत कोणतीही तडजोड केली नाही, अशी भूमिका पाकिस्तानी लष्कराने घेतली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली पाक लष्कराच्या कोर कमांडरची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुलभूषण यांना फाशी दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यापूर्वीच भारताने दिला होता. तसेच, कुलभूषण यांना वाचविण्यासाठी आउट ऑफ वे जाऊन कारवाई करू, असेही भारताने ठणकावले. भारताच्या या इशार्याकडे पाकिस्तानने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोन देशातील तणाव प्रचंड वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताचा दबाव झुगारला..
पाकिस्तानी लष्कर राष्ट्रविरोधी कृत्य करणार्यांशी तडजोड करू शकत नाही. कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानात हेरगिरी केली असून, देशविघातक कृत्य केले आहे, असे या बैठकीत लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी सांगितल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या प्रसिद्धी विभागाने कळवले आहे. फिल्ड जनरल मार्शल कोर्टाने जाधव यांना दिलेली फाशीची शिक्षा योग्य असल्याची पुष्टीही बाजवा यांनी केली व त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यावरून पाकिस्तान मागे हटू शकत नाही, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. कुलभूषण यांना फाशी दिली गेली तर ती भारतीय नागरिकाची पूर्वनियोजित हत्या ठरेल, असे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पाक लष्कराला ठणकावले होते. तसेच, या फाशीमुळे द्वीपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होतील, असेही त्या म्हणाल्या होत्या. तरीही पाक लष्कराने भारताच्या दबावाला बळी पडण्यास नकार दिला.
पाकिस्तानचा निवृत्त कर्नल भारताच्या ताब्यात!
दरम्यान, नेपाळमधून आपल्या लष्कराचा एक निवृत्त अधिकारी बेपत्ता असल्याची कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने मोठा दबाव आणल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याच्या हालचाली दिसून आल्या. कुलभूषण यांच्या फाशीच्या मुद्द्यावर काय भूमिका घ्यायची? यावर रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठस्तरीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकार्यांना कुलभूषण जाधवशी संबंधित सखोल माहिती देण्यात आली. तसेच, भारत-नेपाळ सीमेजवळ लुंबिनी येथे कर्नल (निवृत्त) मोहम्मद झहिर हबीब यांना पकडण्यात आले आहे. कुठलेही कारण न देता त्यांना ताब्यात घेतले गेले आहे. हबीब हे सध्या भारताच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येते, असा आरोप पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफिस झकारीया यांनी केला.