कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी कॉँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम

0

भुसावळ। महाराष्ट्राचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांच्यावर ते भारतीय गुप्तहेर संस्थेचे हेड असून हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात घुसले अशा खोट्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारने अटक करुन त्यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खटला भरत बचावासाठी कुठलीही संधी न देता आंतरराष्ट्रीय कायदा पायदळी तुडवून कुलभूषण यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या या धोरणाच्या विरोधात तसेच कुलभूषण जाधव यांना भारतात सुखरुप आणण्याच्या मागणीसाठी शहर कॉँग्रेसतर्फे 19 रोजी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

कायदेशीर मदत मिळावी
बलुचिस्तानातून जाधव यांना अटक केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पण अफगाणिस्तान आणि र्जमनीच्या वकीलांनी पाकिस्तानचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनीही कुलभूषण जाधव हे रॉ या भारतीय गुप्तहेर संस्थेसाठी हेरगिरी करत असल्याचे पुरावे नसल्याचे पाकिस्तानी संसदेत सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जाधव यांना कायदेशीर मदत देण्यासाठी भारतीय वकीलातील अधिकार्‍यांनी 13 वेळा पाकिस्तान सरकारकडे परवानगी मागितली. मात्र ती त्यांना देण्यात आली नाही. याचा निषेध करण्यात आला.

मोहिमेत यांचा होता सहभाग
तसेच जाधव यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकील देण्याची परवानगी ही दिली नाही. यावरुन पाकिस्तानचा पूर्वग्रह दूषित दृष्टीकोन सिद्ध होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राला वाचवण्यासाठी सरकारने अधिक आक्रमक होऊन सक्रिय धोरण स्विकारावे व आंतरराष्ट्रीय दबाव आणून जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेतून करण्यात आली आहे. या मोहीमेचे आयोजन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, प्रदेश प्रतिनिधी योगेंद्रसिंह पाटील, सरचिटणीस रहीम मुसा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मोठया प्रमाणात नागरिकांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग नोंदविला होता.