कुविख्यात विष्णू पथरोडसह दोघांना भुसावळात अटक

0

भुसावळ- रेल्वे गाडीत खाद्य पदार्थ विक्री करत असल्याच्या कारणावरून शेख रफीक शेख साबीर व त्याच्या मित्राला शुक्रवार, 14 रोजी सकाळी दगडी पुलाजवळ गाडीतून खाली उतरल्यानंतर बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड आणि मोहित टोनी यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली होती तसेच आरोपींनी 11 हजार रूपये रोख आणि मोबाईल असा एकूण 15 हजार 400 रूपयांचा ऐवज हिसकावल्याप्रकरणी शनिवारी शेख रफीक याच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते तर आरोपी बुधवारी भुसावळात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयीत आरोपी विष्णू परशुराम पथरोड (22) व मोहित टोनी (21) रेल्वे स्थानक परीसरातील केला सायडींगजवळ येताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली. ही कारवाई स्वतः पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, एएसआय दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर आदींच्या पथकाने केली. आरोपींना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून अन्य आरोपींनाही लवकरच अटक होईल, असे डीवायएसपी राठोड म्हणाले.