भुसावळ- रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या व हल्ली जळगावात रीक्षा चालकाचे काम करणार्या इसमाचा भुसावळात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने मृत्यू झाला. ईश्वर भावलाल पाटील (40) असे मयताचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास कोणार्क रुग्णालयामागील राष्ट्रीय महामार्गावर कुठल्यातरी वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जबर जखमी झाले. शहर पोलिसांना माहिती कळताच 108 रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अज्ञात वाहन अपघातानंतर पसार
ईश्वर पाटील यांना महामार्गावर अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांच्या दोघा पायांना जबर दुखापत झाली. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने पळ काढला तर घटनास्थळी मात्र धडक देणार्या वाहनाने काही पार्ट पोलिसांना आढळून असून तपासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा धागा ठरणार आहे. शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एएसआय संजयसिंग परदेशी, हवालदार मो.वली सैय्यद, विजय पाटील, चंद्रशेखर गाडगीळ, होमगार्ड गोसावी आदींनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांना जळगाव सामान्य रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेद्वारे हलवले मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, आई, वडील असा परीवार आहे. दरम्यान, पाटील हे जळगावहून भुसावळात का व कसे आले? याबाबत नातेवाईकांनीही आश्चर्य व्यक्त केले.