कुस्तीच्या दंगलीतून वस्ताद लहुजी यांची जयंती साजरी

0

जामनेर : वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीदिनानिमित्त व कै.ईश्‍वर वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ जामनेरात भव्य अशा कुस्त्या दंगलीचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्याहस्ते कुस्तीचेी जोड लावून करण्यात आले. कुस्त्यांच्या दंगलीत जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही पहिलवान कुस्त्या खेळण्यासाठी सहभागी झाले होते. चाळीसगावच्या तिसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या विजय चौधरीच्या घोडदौडीपासून जिल्ह्यात वातावरण कुस्तीमय झाले असून त्यांची प्रचिती आजच्या कुस्ती दंगलीतून दिसून आली. यामध्ये जिल्ह्यातील कुस्तीपटुंना प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विविध ठिकाणाहून पहिलवानांची गर्दी
तालुक्यातील क्रिडापटुंना आपल्यातील विविध गुणांच्या कौशल्यासाठी क्रिडांगणासह आवश्यक बाबींची पुर्तता करुन मिळावी, असा सुर यावेळी क्रीडा प्रेमींमधून व्यक्त केला गेला. तर मंत्री ना.गिरीश महाजन हे ही उत्तम स्वत: क्रिडापद असल्याने क्रिडाप्रेमींच्या आशा यातून अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी लहूजी साळवे मित्र मंडळ व कै.ईश्‍वर वाघ मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी मालेगाव, इंदौर, चाळीसगाव, बुलढाणा, पानेवाडी, पुणे या ठिकाणाहून पहिलवान आले होते. एकूण 2 लाखापर्यंत जामनेर कुस्त्याची जोड लावण्यात आली. शेवटची 21 हजारांची कुस्ती राहूल इंगळे, प्रवीण देशमुख (कुर्‍हाड) व बाळासाहेब देसाई (मालेगाव) यांच्यात झाली. यात प्रवीण देशमुख हा विजयी ठरला. लहान पहिलवानही यात सहभागी होते.