जळगाव । कृषि उत्पन्न बाजार समितीतून बाहेर येणार्या बोलेरो गाडीने वळण घेत असतांना प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर रिक्षाचालक हा गंभीर जखमी आहे. रिक्षाचालक विठ्ठल अविनाश भोसले (वय-42 रा. चिंचाली) यांनी त्यांच्या रिक्षा क्रं. एमएच.19.व्ही.7466 मध्ये औरंगाबाद रस्त्यावरील आर.एल.चौफुलीवरून चार प्रवासी बसविले. यानंतर शहरातकडे येत असतांना दुपारी 12.05 वाजता कृषि उत्पन्न बाजार समितीतून बाहेर पडणार्या बोलेरा गाडी (क्रं.एमएच.19.वाय.6249) ही वळण घेत असतांना अविनाश भोसले यांच्या रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात रिक्षाचे काच फुटून पुढील भाग दाबले जावून रिक्षा पलटी झाली. यात रिक्षाचालक अविनाश भोसले हे गंभीर जखमी झाले.
यासोबतच प्रवासी कल्पना गणेश जाधव, शोभाबाई अरूण मोरे, कांताबाई संतोष मरसाळे तर अरूण रतन मोरे ह चार जणही जखमी झालेत. यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना लागलीच दुसर्या रिक्षात बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यात रिक्षा चालक अविनाश भोसले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला हाताला दुखापत झाली आहे.