झटापटीत एक जण फरार ;सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले होते कैद होते कैद
जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या भामटे लांबवित असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या आधारावर सुरक्षा रक्षकांनी रात्रभर लक्ष ठेवून धान्य लांबविण्याच्या प्रयत्नातील दोन जणांना रंगेहाथ पकडले. मात्र झटापटीत एक जण फरार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विठ्ठल आत्माराम नेरकर (रा.दत्त नगर, रामेश्वर कॉलनी) यास ताब्यात घेतले आहे
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आशिष शंकर अग्रवाल (32, रा.अयोध्या नगर, जळगाव) यांचे दोन दुकान आहेत. गहू, दादर व बाजरी विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करुन जाताना धान्याच्या गोण्या काही बाहेरच ठेवलेल्या असतात. त्यांच्या दुकानाबाहेरुन सतत गोण्या चोरी होत असल्याने अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन जण दुचाकीवरुन गोण्या चोरुन नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षक विजय पितांबर सोनवणे व समाधान रमेश सोनवणे यांना दुकानातून दोन दिवसापासून धान्याच्या गोण्या चोरी होत असल्याचे सांगून आज रात्री बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.
दुचाकीवरुन 9 गोण्या ठेवून पलायनाचाप्रयत्न
पहाटे साडे चार वाजता दुचाकीवरुन (क्र.एम.एच.19 ए.बी.1777) दोन जण आले. त्यांनी 60 किलो वजनाच्या दादरच्या चार, 30 किलो वजनाच्या बाजरीच्या चार व 50 किलो वजनाची गव्हाची एक अशा 14 हजार 660 रुपये किमतीच्या गोण्या दुचाकीवर ठेवून पलायन करणार तितक्यात सुरक्षा रक्षक विजय सोनवणे यांनी दोघांना पकडले. त्यावेळी जोरदार झटापटी झाली. त्यात एक जण पळून गेला. दरम्यान, त्याच वेळी गस्तीवर असलेले एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे तुकाराम निंबाळकर बाजार समितीकडून जात असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने त्यांना आवाज देऊन बोलावून घेतले. पकडण्यात आलेल्या संशयिताला त्याचे नाव विचारले असता त्याने विठ्ठल आत्माराम नेरकर असे सांगितले. दरम्यान, यावेळी सुरक्षा रक्षकाने मालक अग्रवाल यांनाही फोन करुन बोलावून घेतले. याप्रकरणी दोघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.