कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत मर्यादा

0

नुकतीच पहिले वहिले कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) मुंबईमध्ये कार्यान्वित करण्याची घोषणा केली गेली आहे. आगामी काळाची पावले ओळखून कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव यांच्या संशोधनासाठीचे प्रकल्प राबवणे, हे देशाने जागतिक स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असले, तरी अमाप मनुष्यबळ असलेल्या भारताने त्याचा किती वापर करावा, याचा सर्वांगाने विचार करणे आवश्यक आहे. गेल्या काही दशकांमध्ये झपाट्याने यांत्रिकीकरण झाले.

दळणवळण, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, दूरसंचार, घरगुती उपकरणे, अवकाश अशा जवळपास सर्व क्षेत्रांत यंत्रांनी मनुष्याचे आयुष्य व्यापून टाकले आहे. दळणवळणाचा विचार केला, तर काही दशकांमध्येच बराच लांबचा पल्ला गाठला गेला आहे. बैलगाड्या जाऊन सायकली, गाड्या आल्या, विमाने आली. त्याचा पुढचा टप्पा म्हणून चालकविरहित गाड्या, उडणार्‍या चारचाकी गाड्या याही येऊ घातल्या आहेत. अशीच यंत्रभरारी प्रत्येकच क्षेत्रात आहे. यंत्रांमुळे वैयक्तिक, सामाजिक, औद्योगिक, राष्ट्रीय जीवन सुकर होत असले, तरी या यंत्रांवर किती प्रमाणात निर्भर राहायचे आणि निसर्गाशी किती जोडलेले राहायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भारताने यंत्रयुगात टिकून रहाण्याच्या दिशेने पावले टाकली असली, तरी या कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग कसा आणि कुठल्या मर्यादेपर्यंत करायचा, याच्या नैतिक मर्यादा आखून घेणे आवश्यक आहे. प्रचंड प्रमाणात गोळा होणार्‍या माहितीचे विश्‍लेषण आणि त्याआधारे सूचना देणे, एका विशिष्ट पद्धतीची कामे करणे, दिलेल्या ‘प्रोग्रॅम’च्या आधारे निष्कर्ष काढणे, अशी असंख्य कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे करता येऊ शकतात. खाणकाम, अवकाश, संरक्षण अशा क्षेत्रांमध्ये यंत्रमानव लाभदायी आहेत.

थोडक्यात मानवी मेंदू आणि देह करू शकणारी सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने करणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. यंत्रमानव म्हणजे रोबो. ते भारतात तितक्या प्रमाणात प्रचलित नसले, तरी विदेशात त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. चीन, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, अमेरिका अशा देशांमध्ये औद्योगिक क्षेत्रात सर्रासपणे यंत्रमानवांचा वापर होतो. एका सांख्यिकीनुसार वर्ष 2014 मध्ये 2 लाख 29 हजार औद्योगिक यंत्रमानवांची विक्री झाली. चीनमध्ये 57 हजार, तर जपान, अमेरिका आदी देशांमध्ये 25 हजारांच्या आसपास यंत्रमानव विकले गेले. हेच प्रमाण भारतामध्ये केवळ 2 हजार एवढे होते. नुकतेच सौदी अरेबियाने ‘सोफिया’ या यंत्रमानवाला नागरिकत्वही दिले, अशा प्रकारे यंत्रमानवाला नागरिकत्व मिळत गेले, तर उद्या यांत्रिक माणसे आणि हाडामांसाची माणसे यांचे विचित्र जग आणि विचित्र समस्या उद्भवू शकतील. चुकांविरहित कामे किंवा एखादे कंटाळवाणे काम करणे, या गोष्टी यंत्राच्या साहाय्याने करता येतात.

भावभावना नसल्याने यंत्र एकच काम सातत्याने त्याच परिणामकारकतेने करू शकते. जी कामे माणसांनी करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे, अशी कामे यंत्रमानवाच्या साहाय्याने वेगाने आणि अचूकतेने करता येऊ शकतात. या सर्व गोष्टी आश्चर्यकारक आणि आकर्षक वाटत असल्या, तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तोटेही अनेक आहेत. बुद्धिमत्ता, भावभावना, आस्तिकता अशा निसर्गाने मनुष्याला दिलेल्या अमूल्य देणग्या आहेत.

– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117