कृषीसेवक भरतीत गैरप्रकार

0

सांगवी : कृषी सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषद आणि कंपनी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सांगवी येथील मेसर्स गजानन एन्टरप्रायझेस या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर 2015 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत हा सर्व गैरप्रकार झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. कृषी विभागाचे सहसंचालक सुधीर ननवरे (वय 51, रा. जानकी अपार्टमेंट, सहकारनगर) यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे.

अनेक परीक्षार्थींना परीक्षेविषयी संशय
राज्य सरकारने 15 डिसेंबर 2015 रोजी दिलेल्या पत्रानुसार, त्याच महिन्यात परीक्षा परिषदेसोबत करार करून परीक्षा घेण्यास सांगितले होते. त्यानंतर परीक्षा परिषदेने परीक्षा घेण्यासाठी सांगवी येथील मेसर्स गजानन एन्टरप्रायझेस या कंपनीची नियुक्ती केली. रिक्त पदे भरण्यासाठी डिसेंबर 2015 मध्ये जाहिरात प्रकाशित करून 6 ऑगस्ट 2016 रोजी परीक्षा आणि 6 सप्टेंबर 2016 मध्ये निकाल जाहीर केले होते. संकेतस्थळावर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक परीक्षार्थींना परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आला होता.

धुळ्याच्या उमेदवारामुळे फुटले बिंग
काही परीक्षार्थींनी याप्रकरणी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, कृषी विभाग व कृषी आयुक्तांकडे परीक्षेतील गैरप्रकाराबाबत आक्षेप नोंदवले होते. यामध्ये विशाल उखा पाटील हा धुळे येथील परीक्षार्थी औरंगाबाद आणि ठाणे या दोन्ही विभागासाठी नियुक्त झाल्याचे निदर्शनास आले होते. परीक्षा परिषद आणि गजानन एन्टरप्रायझेस यांनी अशाप्रकारे अनेक परीक्षार्थींची फसवणूक केल्यामुळे सहसंचालकांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली.