धुळे । नियोजित कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच स्थापन करण्यासाठी शासनाने नेमलेल्या डॉ.एस.वाय.पी.थोरात व डॉ.व्यंकेटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबाजवणी करण्यात येईल, अशा प्रकारचे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात केले. विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची गुलमोहर शासकीय विश्रामगृहात भेट घेवून निवेदन सादर केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
तिसर्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट : धुळ्यात कृषी विद्यापीठ व्हावे, यासाठी सन 2009 पासून प्रा.शरद पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवत मागासलेल्या धुळे जिल्ह्याकडे सरकारचे लक्ष वेधले. पुढे ही मागणी जनआंदोलनाच्या स्वरुपात धुळे जिल्हाचा विकासाचा प्रश्न बनून पुढे आली आहे. सन 2015 पासून या मागणीने जनआंदोलनाचे स्वरुप घेतले आहे. याबाबत विद्यापीठ निर्माण कृती समिती सातत्यपुर्ण या मागणीचा पाठपुरावा करीत आहे. प्रा.शरद पाटील यांनी तिसर्यांदा शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सदर मागणी जीवंत ठेवत सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार : मुख्यमंत्र्यांच्या नजरेत सदर प्रश्न आधोरेखित करण्यासाठी शिष्टमंडळाने भेट घेवून याप्रश्नी धुळे जिल्हावासीय आक्रमक आहेत, हे दाखवून दिले. निवेदनात विद्यापीठ स्थापनेच्या अनुकुलतेचे सर्व मुद्दे मांडण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे वेळ देवून निवेदन स्विकारले. याप्रसंगी कृती समितीच्यावतीने पदाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल,श्रीफळ व गणेशमुर्ती भेट देवून सत्कार केला व निवेदन दिले. याप्रसंगी निमंत्रक प्रा.शरद पाटील, सदस्य साहेबराव देसाई, भुपेंद्र लहामगे, यशवर्धन कदमबांडे, समिती सचिव धीरज पाटील, अतुल सोनवणे, कैलास पाटील, दिनेश पाटील, अॅड.राहुल साळवे, डॉ. संजय पाटील, नाना कदम, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.
विद्यापीठासाठी पूरक वातावरण
राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करुन नवीन विद्यापीठे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कुलगुरु डॉ.व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला जानेवारी 2016 या महिन्यात सादर झाला आहे. ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा निष्कर्ष या समितीने आपल्या अहवालात दिला आहे, यामध्ये धुळ्याचे नाव प्राधान्यक्रमावर आहे. धुळे, जळगांव व नंदूरबार जिल्ह्यांकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. विद्यापीठाचे मुख्य लक्ष राहुरी, पुणे व कोल्हापूरकडे अधिक आहे. त्यामुळे या विभागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे.