बारामती । महावितरणच्या बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांतील 31 हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यांत कृषिपंपांचे वीजबिल भरले आहे. महावितरणकडे 19 कोटी 32 लाख रुपयांचे रक्कम बिलांपोटी जमा झाली आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने कृषिपंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
कृषिपंपधारक शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जून-2017चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत 31 मार्च 2017 पर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. यात बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यांतील एक लाख 59 हजार 323 ग्राहकांकडे 754 कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील 526 कोटी 68 लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीजबिलांसह भरल्यास 211 कोटी 55 लाख रुपयांचे व्याज व 6 कोटी 58 लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. ज्या कृषिपंपधारकांकडे 30 हजार रुपयांच्या आत थकबाकी आहे, अशा ग्राहकांना 5 सुलभ हफ्ते तर ज्या कृषिपंपधारकांकडे 30 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा ग्राहकांना मूळ थकबाकी भरण्यासाठी 10 सुलभ हफ्ते मिळणार आहेत. दरम्यान, बारामती मंडलात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यातील 31 हजार 538 शेतकर्यांनी या महिन्यात 19 कोटी 32 लाख रुपये कृषिपंपांच्या वीजबिलापोटी भरले आहेत. सर्व कृषिपंपधारकांनी आपले वीजबिल तातडीने भरावे असे आवाहन महावितरणने केले आहे.