जळगाव । कृषी विभागांतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन पोलीस कवायत मैदानावर येथे सकाळी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. आदर्शकुमार रेड्डी यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन केले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, जळगावचे उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, शास्त्रज्ञ डॉ. सुदाम पाटील, डॉ. हेमंत बाहेती, बाळासाहेब सूर्यवशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निर्देशक अमित पाटील उपस्थित होते.
13 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप
दोन दिवसीय स्पर्धेचा आज 13 फेब्रुवारी रोजी समारोप होईल. आपल्या उद्घाटनपर भाषणात श्री. रेड्डी म्हणाले की, उपक्रमात सहभाग नोंदविणे हे आपला नोकरीतील कार्यकाळासाठी उपयुक्त असते. त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहायभूत ठरते, असे सांगून कृषी विभागाने आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धा कौतुकास्पद उपक्रम आहे.
प्रारंभी प्रास्ताविकात जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनामधील हेतू स्पष्ट करतांना सांगितले की, कर्मचार्यांमधील सांघिक भावना विकसित होते, आपापसातील मतभेद दूर होऊन परस्परातील आदरभाव वाढीस लागतो. अशा प्रकारच्या स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असून, यात जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी होत आहेत. 12 व 13 फेब्रुवारी रोजी या स्पर्धा होत आहेत. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जिल्ह्यातील कृषी विभागातील 350 खेळाडू सहभागी झाले आहेत. 100, 200 व 400 मीटर धावणे. बुद्धिबळ, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, रस्सीखेच, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. यात विजयी होणारे स्पर्धक, संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जातील. सूत्रसंचालन श्री. फारुक शेख यांनी, तर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी आभार मानले. खेळांडूना तंत्र अधिकारी प्रवीण आवटे यांनी शपथ दिली.