कृष्णापुरी येथे रेशन मालाची अवैध मार्गाने विक्री

0

चाळीसगाव – तालुक्यातील मौजे कृष्णापुरी येथील रेशन दुकानदार रेशनिंगचा माल ग्रामस्थांना न देता काळ्या बाजारात परस्पर विकत असल्याची तक्रार गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे शुक्रवार 23 डिसेंबर रोजी केली आहे. ग्रामस्थांनी संबंधीत दुकानदारांवर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा यावेळी दिला आहे.

खाजगी दुकानदाराला माल विक्रीचा आरोप
कृष्णापुरी ता चाळीसगाव येथील रुपसिंग बाबू जाधव, कांतीलाल रुपचंद जाधव, निवृत्ती चरणदास जाधव, शांताराम पोपट राठोड यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. या निवेदनात चाळीसगाव तालुक्यातील कृष्णापुरी येथे ग्रामस्थांच्या नावाने शिधा पत्रिका आहेत. त्या प्रमाणे प्रत्येक ग्रामस्थाला रेशनिंगचा माल मिळणे आवश्यक असतांना मौजे कृष्णापुरी येथील दुकानदार रेशनचा माल गोर गरीब ग्रामस्थांना न देता त्याची अवैध मार्गाने बेकायदेशीर पणे लोंढे येथील माताजी प्रोव्हिजनला विक्री करत आहे असा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील ग्रामस्थ ऊसतोडणीसाठी बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत आहे. याबाबत रेशन दुकानदारास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने अर्जदारांशी अरेरावीची भाषा करून गर्विष्ठ पणाने तुम्ही कुठे हि जा माझे काही होणार नाही अशी भाषा वापरली. ग्रामस्थांनी या रेशन दुकानदारा विरोधात अर्ज दाखल करूनही त्याची कोणत्याही प्रकारची चौकशी होत नसल्याचे म्हटले आहे. अर्जांची चौकशी करून दुकानदारांवर कठोर कारवाई करावी असे न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.