24 नोव्हेंबरला सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन
इंदापूर : कृष्णा-भिमा स्थिरीकरण सिंचन योजना ही उस्मानाबाद, बीडसाठी फायद्याची असून ती उस्मानाबाद जिल्ह्यातील 87 हजार 188 हेक्टर व बीड जिल्ह्यातील 27 हजार 543 हेक्टर क्षेत्राला लाभदायी ठरणार आहे. परंतु ज्या ठिकाणाहून हे पाणी नेण्यात येणार आहे. त्या इंदापूर तालुक्यासह करमाळा, माढा, दौंड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनींचे वाळवंट होणार आहे. इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त व सर्वसामान्य शेतकर्यांच्या जीवावर उठलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे चालू असलेले काम त्वरीत बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी 24 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-सोलापूर महामार्गावरील पळसदेव येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. बोगद्याचे काम त्वरीत थांबवावे. कृष्णा खोर्यातील पाणी उजनीत आल्याशिवाय मराठवाड्याला पाणी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती माने यांनी दिली.
कॉंग्रेसने दिला धरणग्रस्त शेतकर्यांचा बळी
हर्षवर्धन पाटील स्वत: मंत्री असताना त्यांनी तालुक्यातील शेतकर्यांना अंधारात ठेवले व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मंजुरी देऊन धरणग्रस्त शेतकर्यांचा बळी दिला. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे राष्ट्रवादीच्या लक्षात येताच त्यांनी पळसदेव येथे मोठे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. त्यांनी गुरुवारी पळसदेव येथे घाईगडबडीत धरणग्रस्त बचाव बैठकीचे आयोजन केले.