कॅन्सर जागृतीसाठी धडपड !

0

नंदुरबार (रविंद्र चव्हाण)। आज जागतिक महिला दिन म्हणजेच महिलांच्या कतृत्वाला सलाम करण्याचा दिवस, समाजात अशा अनेक महिला आहेत की, त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याच्या ठसा उमटविला आहे. नंदुरबार शहरातील भावना मारू व सुर्वाता मारू या मायलेकींनीही महिलांच्या आरोग्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्वेचेचा कॅन्सर होऊ नये, यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे याचा संदेश देत कार्यशाळा घेऊन या मालेकी जनजागृती करीत आहेत.

अनेक महिलांची साथ
मायलेकीला साथ देण्यासाठी अहमदाबाद येथील सिल्वर संचालिका प्रभा देशपांडे यांचेही योगदान आहे. लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा हिना रघुवंशी, अंजना रघुवंशी या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना देखील प्रोत्साहन देण्याची भूमिका निभावली आहे. सुंदर दिसण हा महिलांचा स्वभाव असतो, त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या कॉस्मेटीक क्रिम वापरण्याची जणू स्पर्धाच असते. सौंदर्य साधनांचा वापर अतिरेकी होऊ लागला आहे. काही उत्पादने असे असतात की, त्याचा फटका महिलांच्या आरोग्यावर होतो. याची जनजागृती करण्यासाठी भावना मारू व सुर्वाता मारू व प्रभा देशपांडे या नारिशक्तीने कंबर कसली आहे. स्त्री शक्तिचा जागर व स्त्री सक्षमीकरण करून चौकटीच्या पलिकेडे असणार्‍या स्त्री बदलाची गुढी उभारण्याची नांदी समजावी.

औषधनिर्माण शास्त्राची विद्यार्थिनी
स्त्री ही समाज व्यवस्था टिकवणारी महत्त्वाचा घटक आहे. तिचे प्रेम आणि त्याग यावरच सार्‍या संसाराची उभारणी आहे. अनेक रूढी पंरपरेच्या बेडीत स्वतःला अडकावून घेतलेल्या नवर्‍याची मर्जी सांभाळत सार्‍या कुटुंबाला सांभाळताना हताश आणि जगण्याची परीक्षा देत देत महिला पुढे जातांना दिसत आहेत. भावना मारू यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून त्यांची कन्या सुर्वाता ही औषध निर्माण शास्त्राची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी या विद्यार्थिनीने कॅन्सर या विषयावर सादर केलेल्या प्रोजेक्टची निवड झाली आहे. जळगाव विद्यापिठाने एका आविष्कार कार्यक्रमात सन्मान देखील केला होता. तसेच आता राहुरी विद्यापीठासाठी राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे.

ब्युटी प्रोडक्ट बद्दल माहिती
आपल्याकडे अवगत असलेल्या या ज्ञानाचा वापर करून कॅन्सर रोखण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. भावना मारू यांच्या म्हणण्यानुसार आजच्या काळात तरूण तरूणी ब्युटी प्रोडक्टचा वापर करीत असतात. काही प्रोडक्ट स्लो पॉईझन प्रमाणे त्वचेचा कॅन्सर निर्माण करतात, मात्र, याची कल्पना नसल्याने सुंदर दिसण्याच्या मोहापाई आजाराला निमंत्रण दिले जाते. भावना व सुर्वाता या मायलेकींनी महिलांची कार्यशाळा घेत कॅन्सरची जनजागृती सुरू केली आहे.