कॅलेंडरवर गांधीजींऐवजी पंतप्रधान मोदी यांचा फोटो

0

मुंबई । खादी ग्रामोद्योगचं कॅलेंडर आणि डायरी याच्यावरून महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा लावण्यात आल्याने कर्मचारी वर्गाने त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मुंबईत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात आज दुपारी जेवणाच्या वेळेत अनेक कर्मचारी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेष करून आपला निषेध व्यक्त केला.

कर्मचार्‍यांनी केला निषेध
गांधी आणि खादी असं अतुट नातं आहे. मात्र ही परंपरा मोडून खुद्द खादी आणि ग्रामोद्योग आयोगानेच महात्मा गांधी यांचा फोटो वार्षिक कॅलेंडर व डायरीतून वगळली आहे. त्याजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चरख्यावरील फोटो लावण्यात आला आहे. कॅलेंडरच्या बाराही पानांवर मोदी यांचाच फोटो आहे. यामुळे कर्मचारी वर्गाने उघड नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. गेल्यावर्षी ही बाब कर्मचार्‍यांनी चेअरमन विनयकुमार सक्सेना तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी पुढच्यावर्षी यात दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते पण तसं काहीही झाले नसल्याने कर्मचारी संतप्त झाले. याचा निषेध म्हणून मुंबईत विलेपार्ले येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यालयात कर्मचार्‍यांकडून आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.