भुसावळ : कॅशलेस व्यवहार व ई बँकिंगमुळे एटीएम व बँकेतील रांगा कमी होण्यास मदत झाली आहे. डिजीटल इंडियाच्या दृष्टीने हे पाउल आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील नीती फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश जोशी यांनी केले. माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठान जळगाव व जैन सोशल गृप भुसावळच्या संयुक्त विद्यमाने 8 रोजी सायंकाळी सुराणा साधना सदनमध्ये डिजीटल पेमेंटवर आयोजित कार्यशाळेला नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. यावेळी मंचावर जळगाव जनता बँकेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयंतीलाल सुराणा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी कुणाल महाजन, जैन सोशल गृपचे अध्यक्ष प्रशांत कोटेचा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम चोरडीया यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करतांना जयेश जोशी यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने उपस्थितांना कॅशलेस व्यवहार म्हणजे काय याची माहिती करुन दिली. तसेच केंद्र शासनाने निर्मित केलेले ‘भिम’ अॅप्सची माहिती देवून त्याचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकाद्वारे केले मार्गदर्शन
इंटरनेट नसतांना तसेच अद्यावत मोबाईल नसतांना साध्या मोबाईलव्दारे कशा प्रकारे आपण आपल्या बँक खात्याची माहिती जाणून घेवू शकतो याचे प्रात्याक्षिक दाखविले. ई-बँकींग करतांना कोणती काळजी घ्यावी. कशा प्रकारे फसवणूक होवू शकते ती टाळण्याचे उपाय याची माहिती देवून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम चोरडीया यांनी तर आभार निलेश वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजित कोटेचा, विशाल चोरडीया, लोकेश नहार, अशोक दोषी, कलेश निकुंभ, गोलू देवडा, रितेश चिप्पड, राजेश बाफना, बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉ. प्रमोेद जैन, सुनिल झाबक, विवेक चोरडीया, टिना चोरडीया यांनी परिश्रम घेतले.