केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत २८ हजार १०४ कोटींची मदत – फडणवीस

0

मुंबई – केंद्र सरकारने करोना काळात निधी उपलब्ध करुन दिला नाही असा आरोप केला जात असला तरी आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी केंद्राने राज्य सरकारला उपलब्ध करुन दिला आहे. पीपीई किट, एन-९५ मास्क यांचाही पुरवठाही केंद्राने केला आहे, असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तरीही केंद्राने काहीही दिले नाही असे भासवले जात आहे असेही फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषद म्हटले आहे.

केंद्र सरकारने राज्याला १० लाख पीपीई किट्स दिल्या. तर १६ लाख एन ९५ मास्कही दिले. याशिवाय वैद्यकीय साहित्य राज्याला खरेदी करता यावे यासाठी ४४८ कोटी दिले आहेत. यासह प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत १७२६ कोटी केंद्र सरकारने दिले आहे. दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी १६ कोटी रुपये दिले आहे. महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन्स सुटल्या, प्रत्येक ट्रेनमागे केंद्राला ५० लाखांचा खर्च, राज्याने तिकिटांचे केवळ सात ते नऊ लाख खर्च केले, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे. पैसे नाहीत म्हणून शेतकरी, बारा बलुतेदार यांना मदत करणार नाही अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात आणि काँग्रेसशासित छत्तीसगडनेही ही मदत केली आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने काय काय केले?

१) महाराष्ट्रातून ६०० ट्रेन्स सोडल्या यासाठी श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी दिले.
२) मजुरांच्या छावण्यांसाठी १ हजार ६११ कोटींचा निधी दिला.
३) पीपीई आणि एन ९५ मास्क यांचा पुरवठा केला.
४) शेतीसाठी ९ हजार कोटींचा निधी दिला.
५) एप्रिल आणि मे महिन्याचा निधी आगाऊ दिला.
६) गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत १७५० कोटींचा गहू, २६२० कोटींचा तांदूळ, १०० कोटींची डाळ दिली.
७) जनधन योजनेचे १३०८ कोटी दिले.
८) उज्ज्वला अंतर्गत १६२५ कोटी दिले.