केंद्राचं बजेट? मग एवढं काय त्यात!

0

बजेट बजेट करून आम्ही का नाचत असतो हे माझं मलाच कळत नाहीये! त्यातल्या त्यात इन्कम टॅक्सच्या मर्यादेत आल्यापासून बजेटच्या त्या भागातलं मला थोडंफार कळतं. सरकारची मेहेरबानी झाली तर वर्षाकाठी दोन-चार हजार रुपये वाचतात. वाचलेले हेच दोन-चार हजार रुपये सरकार इतर गोष्टींचे भाव वाढवून आमच्याकडून दुपटीने नकळतपणे वसूल करून घेते. बजेट म्हणजे सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक अशी सरळसाधी व्याख्या आहे. आता अंदाज म्हटलं की तो चुकणारच अशी समजूत करून लोकं गप्प का बसत नाहीत? नाहीतरी लोकसंख्येपासून ते हवामानापर्यंत कोणता सरकारी अंदाज बरोबर आलाय आजपर्यंत? बरं सरकार इतकं लाखो कोटींचं बजेट सादर करते. पुढल्या वर्षी त्यातले किती खर्च झाले, हा प्रश्‍न कोणालाच कसा पडत नाही? (तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या अध्यक्षपदी जर आमच्या गल्लीतला वाणी बसला असता तर त्याने अर्थमंत्र्यांना, आधी जुना हिशोब क्लीअर करा. मग पुढचं बघू. असं ठणकावून सांगितलं असतं.) तसं पाहिलं तर हा प्रश्‍न आम्हाला महिन्याच्या घराच्या बजेटमध्येसुद्धा पडत नाही. कारण मुळात तो प्रश्‍न पडण्याची गरजच पडत नाही. महिनाअखेर अकाउंटमधली शिल्लक रक्कम बघून आपलं बजेट पार बोंबलंय हे दिसूनच येतं. सरकारला फिस्कल डेफिसिट इकडून तिकडून कमी करण्याची सोय तरी असते. आम्हाला ती पण नाही. आमचं फिस्कटलेलं बजेट म्हणजेच आमचं फिस्कटलं डेफिसिट!

काल रात्री असंच मी बजेट- बजेट म्हणून नाचत असताना बायकोने, एवढं काय त्यात? असं विचारून मला गप्प केलं. तिला एवढं काय हे समजावून सांगताना मला बजेटचा बसुद्धा समजत नाही, अशी माझी अंतरात्मा ओरडून ओरडून सांगत होती. तरीसुद्धा मी जागतिक कीर्तीचा अर्थतज्ज्ञ होऊ शकतो, असा गैरसमज थोडावेळाकरिता निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. पण तेवढ्यात धोब्याकडून पैसे वापस घेताना मी दहा रुपयाची फाटकी नोट घेऊन आलोय, हे तिच्या लक्षात आलं आणि माझ्यातल्या तज्ज्ञांचा त्रिफळा उडाला. आमचं एक जाऊ द्या. (कारण आमचं नेहमीच जाऊ देण्या लायकचं असतं म्हणा!) पण मंत्रालयातले सगळे तज्ज्ञ मिळून बजेट कसं तयार करत असतील, हा प्रश्‍न मला नेहमी पडतो. म्हणजे बघा, अर्थमंत्री असे राजासारखे दरबारात उच्चासनावर बसले असतील. वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी डोळ्यात अत्यंत करुण भाव आणून हात जोडून राजाकडे पैसे मागत असतील. राजा आणि प्रधान आपल्याच तोर्‍यात, का रे रेलव्या, तुला कशाला पाहिजे पाच लाख कोटी? कशाला नवीन रेल्वेलाइन टाकायच्या? आहे त्या सांभाळ आधी..चाल हे घे दोन लाख कोटी..आणि तू रे परिवहन…चारशे कोटींच्या वरती एक रुपया मिळणार नाही सांगून ठेवतो आणि त्या समाजकल्याणला द्या शंभर कोटी. तो रस्तेविकास बघा कसा लपून बसलाय कोपर्‍यात. मागच्या वर्षी सत्तर हजार कोटी दिले तुला ते काय जावयाच्या गावात हायवे बांधण्यासाठी होय रे? एक रुपया देणार नाही तुला आता. तुला किती पाहिजे रे संरक्षण? तुमचं काय बा तुम्ही मोठी माणसं. तुम्हाला ब्लँक चेकचं द्यावा लागतो. प्रधानजी यांना मोकळं करा लवकर. अहो कृषीताई तुम्ही कशाला रडताय? तुमची वेगळी व्यवस्था आहे. हे बघा..तीन लाख कोटी ठेवलेत दुष्काळासाठी.. ओला की कोरडा ते तुमचं तुम्ही बघा…आणि तो बालविकास राहिला की हो. अहो मुलं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य. द्या त्याला हजारेक कोटी. दोन-चार तरी बगिचे बांधा हो याच्यात..आणि हो शिक्षणाचं काय तुमच्या? पाच हजार कोटी देतो अन् सहा नवीन विद्यापीठे घोषित करून टाकतो..चालेल का? ..अरेरे जलसंवर्धन करायचं राहिलं ना..आणि आदिवासी वगैरे..प्रधानजी उरलेले वाटून टाका बरं यांच्यात. चला झाले का सगळे…करा हिशोब प्रधानजी अन् मारा प्रिंटआउट..अन् जरा दोन-चार चारोळ्या वगैरे टाका अधूनमधून ..लोकांना हसवायला बरं पडतं ते असो. बजेट जाहीर झालंय. आज बजेट सादर होण्यापूर्वीच हे मनोगत जगासमोर मांडावं असं वाटत होतं. पण नंतर विचार केला, आपली परिस्थिती ही बजेट सादर होण्याआधीही आणि नंतरही तीच असणार आहे. मग नंतरच करू ना…एवढं काय त्यात!

– राजू शिरधनकर
सामाजिक कार्यकर्ता,मुंबई
9324257259