केंद्राच्या पुरेशा निधीअभावी राज्य अडचणीत

0

मुंबई । केंद्राकडून राज्याला महसूल वाटप करण्यात येत असते. केंद्राकडून मिळणार्‍या निधीसाठी अनेक निकष घालण्यात आलेले आहे. देशाच्या कर उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 40 टक्के आहे. मात्र, त्या प्रमाणात महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून तेवढ्या प्रमाणात निधी मिळत नसल्याने राज्य आर्थिक अडचणीत सापडला असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे यांनी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. दिवसेंदिवस केंद्राकडून मिळणार्‍या निधीत घसरण होत चाललेली असल्याने राज्यासाठी ते आव्हानात्मक असल्याचेदेखील मुंडे यांनी सांगितले. राज्य सरकारने केंद्राकडे अधिक निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली.

धोरणात बदल करावे
2016-17 मध्ये केंद्राकडून 32 हजार कोटींचा महसूल मिळण्याचे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात केवळ 21 हजार कोटीच मिळाले. त्यामुळे केंद्र शासनाने महसूल वाटपाचे नवीन धोरण आखणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याचा मुद्द्यांच्या माध्यमातून केली. केंद्राकडून मिळणार्‍या निधींबाबत आज काळजी घेतली नाही तर भविष्यात राज्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचेही मुंडे यांनी नमूद केले. राज्य जीएसटी, नोटाबंदीमुळे आर्थिक अडचणीत असताना त्यात केंद्राकडून मिळणार्‍या निधीत कपात होणे राज्यासाठी हानिकारक असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.