नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी कायद्यावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून सध्या केंद्रात ‘टुकडे-टुकडे गँग’ सत्तेत आहे असा टोला लगावला आहे. आज शुक्रवारी सकाळी तुषार गांधी यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. यामध्ये त्यांनी “टुकडे टुकडे गँग सध्या केंद्रात सत्तेत आहे” असे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर तुषार गांधी यांनी ही टीका केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) जनतेची दिशाभूल केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले तेव्हा विरोधकांनी अपप्रचार सुरू केला. दिल्लीतील वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘टुकडे-टुकडे गँग’ कारणीभूत आहे असे म्हणत भाजप नेते अमित शाह यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाकडून आयोजित कार्यक्रमात ‘टुकडे-टुकडे गँग’ला अद्दल घडवा असे आवाहन काल केले होते.