केंद्राने जीएसटीचा परतावा दिल्यास पेट्रोल-डिझेलचे कर कमी करू!

0
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा 
मुंबई  – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांवर महागाईचे संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र केंद्र सरकारने राज्याकडून दिल्या जाणार्‍या जीएसटीचा काही प्रमाणात जरी परतावा दिला तरच पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करता येतील, असा खुलासा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
पेट्रोल-डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यामुळे राज्य सरकारला तीन हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे एवढे नुकसान सरकार पुन्हा सोसू शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. केंद्राला तब्बल १८ टक्के जीएसटी देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यानंतर ९ टक्के जीएसटी देऊन उत्तर प्रदेश हे दुसर्‍या क्रमांकावर आहे. या जीएसटीचा परतावा केंद्राने द्यावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. हा परतावा देण्याची तयारी केंद्राने दर्शविली तरच पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करणे राज्य सरकारला शक्य होईल, असे मुनगंटीवार म्हणाले.