भुसावळ तालुक्यातील खडका विद्यामंदिरासह कुर्ह्यातील तीन शाळांची तपासणी
; पोषण आहाराच्या दर्ज्याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा
भुसावळ- केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहार समितीने पहिल्या दिवशी यावल तालुक्यातील शाळांची तपासणी केल्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी भुसावळ तालुक्यातील खडका येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरासह कुर्हा येथील जिल्हा परीषद मुला-मुलींसह माध्यमिक विद्यालयाला भेट देत पोषण आहाराची तपासणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोषण आहाराच्या दर्ज्याबाबत माहिती जाणून घेतली. प्रसंगी विद्यार्थ्यांचे वजन करून उंची मोजण्यात आली तसेच पोषण आहाराचे नमूनेही घेण्यात आले.
खडका जिल्हा परीषद शाळेचे कौतुक
केंद्रीय शालेय पोषण आहार समिती सदस्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास खडका येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिराला भेट देत पोषण आहाराबाबत माहिती जाणून घेतली तसेच शालेय सुविधांबाबत देखील माहिती तपासून घेतली. शालेय पोषण आहार समितीचे प्रमुख भूपेंद्र कुमार, पुणे येथील राजेंद्र शंकपाळ, औरंगाबाद येथील राजेंद्रकुमार खाजेकर, शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील आदींनी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वजन-उंची करून बीएमआय काढला तसेच पोषण आहार साठवलेल्या धान्याची पाहणी केली तसेच धान्य शिजणार्या खोल्यांची (किचन शेड) भांड्यांची व अन्न शिजवणार्या महिलांची माहिती यावेळी समितीने जाणून घेतली. शाळेतील उत्कृष्ट पोषण आहार, शाळेतील परीसर व सुविधांबाबत समितीने यावेळी समाधान व्यक्त केले व शाळेचे व मुख्याध्यापक संजय साखरे यांचे कौतुक केले. जिल्हा परीषद शाळेतील फलकावर ती धान्यादी नमुन्याचे पारदर्शक पाकिटे लावलेली असल्याने यावेळी समितीने दखल घेऊन त्यांचे कौतुक यावेळी केले.
कुर्ह्यातील तीन शाळांची तपासणी
यानंतर समितीने कुर्हा येथील जि.प.शाळा मुला व मुलींची तसेच रा.धो.पाटील माध्यमिक विद्यालयाला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथेही 28 मुद्यांच्या आधारे समितीने तपासणी करीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी भुसावळ गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, तुषार प्रधान, विषय तज्ञ शिक्षक यशवंत धायगुडे, देवेंद्र वाघधरे आदी उपस्थित होते.