केंद्र सरकारच्या मोफत भीम अ‍ॅपचा वापर नाही; विरोधकांचा संतप्त सवाल

0

कर भरणासाठी ‘पेटीएम’चा आग्रह का?
पेटीएमचा मालक भाजपचे देणगीदार

पिंपरी : केंद्र सरकाराचे ‘भिम अ‍ॅप’, विविध बँकांमध्ये मोफत मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तरीदेखील महापालिका मिळकत कर भरण्यासाठी ‘पेटीएम’ची सुविधा कशाला उपलब्ध करुन देत आहे. कर भरणार्‍या नागरिकांकडून पेटीएम शुल्क वसूल करणार असून पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. हा बिनकामाचा भुर्दंड नागरिकांना नाहक सहन करावा लागणार आहे. मोफत उपलब्ध असलेल्या ‘भीम अ‍ॅप’चा वापर न करता ‘पेटीएम’चा आग्रह कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत केला. पेटीएम कंपनीचा मालक सत्ताधार्‍यांचा मोठा देणगीदार असल्याचा आरोप देखील नगरसेवकांनी केला.

मोफत कर भरणा करून
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मिळकत कर ‘पेटीएम’द्वारे भरण्याची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, विविध बँका मोफत कर भरण्याची सुविधा देत असताना ‘पेटीएम’ आग्रह कशासाठी केला जात आहे. तसेच ‘पेटीएम’ सारख्या इतर कंपन्यांकडूनही कर भरणा करण्याची सुविधा मिळावी. पालिकेने कर येण्याची गरज आहे. तसेच ‘पेटीएम’ ला पाच रुपये शुल्क न आकारता मोफत कर भरणा करुन द्यावी.

नागरिकांची फसवणूक
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले की, कर भरण्यासाठी ‘पेटीएम’ सारख्या अ‍ॅपला अनुमती द्यावी. ही सुविधा चांगली आहे. परंतु, केवळ ‘पेटीएम’च नको. कर भरण्यासाठी ‘पेटीएम’ने शुल्क आकारु नये. पेटीएम’ कंपनीचा मालक सत्ताधारी भाजपचा मोठा देणगीदार आहे. भाजप पक्षाला या कंपनीतर्फे मोठी देणगी मिळत आहे. त्यामुळेच पेटीएमद्वारे कर भरण्यासाठी महापालिका नागरिकांना सांगत आहे. आधी केलेली पाणीपट्टी वाढ आता या पेटीएमचे शुल्क घेऊन नागरिकांची फसवणूक होते आहे.

पेटीएमला मोठा व्यवसाय
माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, ‘पेटीएम’ कंपनी कर भरणा केल्याच्या बदल्यात शुल्क आकारणार आहे. विविध बँका मोफत कर भरणा करुन देतात. मग, पेटीएमद्वारे कर भरण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे. ‘पेटीएम’ द्वारे कर भरणा करण्यामागे पालिकेचे हेतू काय आहे. महापालिका ‘पेटीएम’ला मोठा व्यवसाय देणार आहे. तरी, देखील ’पेटीएम’ नागरिकांकडून कर भरण्याच्या मोबदल्यात पैसे घेणार आहे.

भिम अ‍ॅपचा वापर का नाही
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे म्हणाले, केंद्र सरकारने ‘भिम अ‍ॅप’ विकसित केले आहे. या अपॅद्वारे मोफत कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोफत अ‍ॅपमध्ये पैसे जाणार नाहीत. त्यामुळे पेटीएमपेक्षा या अ‍ॅपचा वापर करायला हवा. महापालिकेने कर भरणा करण्यासाठी सरकारच्या मोफत अ‍ॅपचा वापर करायला हवा. त्याऐवजी खासगी कंपनी असलेल्या ‘पेटीएम’चा वापर करण्याचा घाट का घातला आहे. भीम अ‍ॅपचा वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दत्ता साने म्हणाले की, पेटीएमची संकल्पना का आणली तेच कळत नाही. केंद्र सरकारच्या मोफत असलेल्या भीम अ‍ॅपचा वापर का केला जात नाही. यामागे काय हेतू आहे. ‘पेटीएम’ चा नागरिकांकडून पाच रुपये शुल्क आकारणार आहे. पाच शुल्क आकारण्यात येऊ नये.

कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी
याचा खुलासा करताना आयुक्त म्हणाले की, पालिकेची 36 टक्के कर वसुली ऑनलाईन पद्धतीने होत आहे. अधिक कर वसुली व्हावा. कॅशलेश व्यवहाराला चालना देण्यासाठी पेटीएमद्वारे मिळकत भरुन देण्याची सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालिका ‘पेटीएम’ कंपनीला एक रुपयाही देणार नाही. पेटीएमवर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणार्‍या नागरिकांकडून ‘पेटीएम’ शुल्क वसूल करणार आहे. नेटबँकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी 0.80 टक्के शुल्क, डेबिट कार्डवरील दोन हजार रुपयांसाठी 0.50 व 0.75 टक्के शुल्क आकारले जाणार आहे. पेटीएम वॉलेटसाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी हा प्रस्ताव मंजुर केला. त्यामुळे शहरातील नागरिक आता पेटीएमद्वारे कर भरणा करु शकणार आहेत.

नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी हा प्रस्ताव आणला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठीच सर्व करीत आहोत.
-एकनाथ पवार, सभागृह नेते