मुंबई । केईएम रुग्णालयाचा परिसर इतका मोठा आहे की इथे दाखल असलेल्या रुग्णाला पटकन शोधून काढताना रुग्णाच्या नातेवाइकांची चांगलीच दमछाक होते. एखाद्या वॉर्डपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी अनेकांना विचारत विचारत जावे लागते. पण आता रुग्णांच्या नातेवाइकांना वॉर्ड शोधण्यासाठी फार धावपळ करण्याची गरज लागणार नाही, कारण केईएममध्ये बसवण्यात आला आहे, नवा नॅव्हिगेशन मॅप. या मॅपमध्ये अर्थात आराखड्यात रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड ठळकपणे दर्शवण्यात आला आहे.
का बनवला रोडमॅप?
केईएम रुग्णालय हे पालिकेचे मोठे रुग्णालय असून इथे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी रुग्णालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा रोडमॅप तयार केला आहे. या मॅपद्वारे कुठला विभाग कुठे आहे? याची माहिती सहज कळू शकेल. शिवाय, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मॅप लावण्यात आला आहे. रोडमॅपच्या माध्यमातून केईएम रुग्णालयाच्या जुन्या, नवीन इमारतीकडे जाण्याचा मार्गही दाखवण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा रोडमॅप तयार केला आहे. हा मॅप बनवण्यासाठी साधारणतः दोन महिने लागले, असे एकूण 20 मॅप विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. यात जुनी इमारत आणि नवी इमारतीकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांचा मार्ग शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे मी
माझ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो.
– डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.