नवी दिल्ली : मंत्रिपदावरून हटविण्यात आलेले आम आदमी पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर लाचखोरीचा अत्यंत गंभीर आरोप केला. आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना आपल्या डोळ्यासमोर दोन कोटींची लाच दिली, असे मिश्रा म्हणाले. शिवाय, केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी 50 कोटी रुपयांची एक जमीन व्यवहाराची डीलही जैन यांनी करून दिल्याचे मिश्रा यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपाने दिल्लीत एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसने या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, भारतीय जनता पक्षाने केजरीवाल यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर आपचे नेते तथा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मिश्रा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मंत्रिपदावरून काढून टाकल्यामुळेच मिश्रा हे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले.
पाणी घोटाळा बाहेर काढल्याने हटविले
दिल्ली येथील राजघाट येथे महात्मा गांधी स्मृतिस्थळावर दर्शन घेतल्यानंतर पाणी पुरवठामंत्री राहिलेले कपिल मिश्रा पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्यासमोर केजरीवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची लाच सुपूर्त केली होती. याबाबतची माहिती आपण नायब राज्यपाल अनिल बैजल यांनाही दिली होती. तसेच, तपास यंत्रणांनादेखील याबाबत माहिती दिली होती. सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत आपण पुरावे सादर केले असून, सीबीआयने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणीही मिश्रा यांनी केली. केजरीवाल यांच्या एका नातेवाईकासाठी जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी 50 कोटी रुपयांची डीलही करण्यात आली असून, त्यातदेखील केजरीवाल यांचा हात आहे, असा आरोपही मिश्रा यांनी केला. पाणी घोटाळाप्रकरणी आपण आवाज उठविल्यानेच आपल्याला मंत्रिपदावरून हटविण्यात आल्याचेही मिश्रा यांनी सांगितले.
अरविंद केजरीवालांवर गंभीर आरोप
शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. रविवारी सकाळी मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले. परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही, असे मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला. तसेच मी भ्रष्टाचारविरोधी पथकाला पत्र लिहिल्याने मला हटवण्यात आले असे ते म्हणाले. राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नायब राज्यपालांना भेटून आल्यावर त्यांनी केलेल्या ट्विटमधून ज्या वादळाची चाहूल लागली होती, ते अखेर केजरीवालांवर आणि एकूणच ’आप’वर धडकले. अर्थात, हे सर्व आरोप बिनबुडाचे, निराधार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ते फेटाळून लावले आहेत.
केजरीवालांनी जनतेसमोर येण्याचे आव्हान
मिश्रा यांनी केजरीवाल यांना आव्हान दिले आहे की त्यांनी जनतेसमोर यावे आणि सांगावे की इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात आली कुठून? आणि केजरीवालांना इतक्या मोठ्या रकमेची गरज काय आहे? मिश्रा यांच्या या आरोपांनंतर ते भाजपात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर बोलताना त्यांनी सांगितले, की मी आपचा संस्थापक सदस्य आहे, मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही.