केजरीवालांविरुद्ध अटक वॉरंट

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भात वक्तव्य करून थयथयाट करणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलेच भोवले आहे. केजरीवाल यांना आसामच्या एका न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे. केजरीवाल यांनी मोदी यांच्या डिग्रीवर शंका उपस्थित करत, ते केवळ इयत्ता 12 वी पास असल्याची शंका उपस्थित केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी तसे ट्विटही केले होते. भाजपचे नेते सूर्य रॉन्घर यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या आधारे पोलिसांनी केजरीवाल यांच्याविरोधात कलम 499, 500 आणि 501 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 8 मेरोजी पुढील सुनावणी होणार आहे.

गेल्या दोन सुनावणीच्यावेळी केजरीवाल गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी केले आहे. यापूर्वी 10 एप्रिल आणि 30 मार्चरोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते, त्यावेळी केजरीवाल गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर लोकांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावरून केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले होते. केजरीवाल यांच्यावर दाखल केलेल्या कलमानुसार केजरीवाल यांना दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो. किंवा दंड आणि तुरूंगवास दोन्हीही होऊ शकतो.