अहमदनगर । केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खुनाच्या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी संदीप गुंजाळ, संदीप ऊर्फ जॉन्टी बाळासाहेब गिर्हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे या तिघांची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. या आरोपींकडून तपासाच्या दृष्टीने एकमेकांच्या माहितीला विसंगत अशी माहिती दिली जात असल्यामुळे नार्को टेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याचे समजते. याशिवाय केडगाव खून प्रकरणी कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास व घटनेबाबत कोणास काही माहिती असल्यास ती माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून त्याला एक लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
केडगावमधील संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खूनप्रकरणात आरोपी संदीप गुंजाळ हा सातत्याने वेगवेगळी माहिती देत आहे. संजय कोतकर यांचा मी तर वसंत ठुबे यांचा खून संदीप गिर्हे याने केला असल्याचे गुंजाळ याने सुरुवातीला सांगितले होते; मात्र, संदीप गिर्हे याच्याकडे चौकशी केली असता त्याने मात्र दोन्ही खून गुंजाळ यानेच केले असल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेच्या वेळी मात्र संदीप गुंजाळ, संदीप गिर्हे व महावीर मोकळे हे तिन्ही आरोपी तेथेच असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच खून झाला, त्या ठिकाणाच्या आसपास कुठेही सीसीटीव्ही नाहीत व अद्याप कोणीही प्रत्यक्षदर्शी माहिती देण्यास पुढे आलेला नाही. त्यामुळे तपासात आरोपींकडून मिळणार्या वेगवेगळ्या माहितींची खात्री करण्यासाठी व नेमकी माहिती समोर येण्यासाठी पोलिसांनी या तिन्ही आरोपींची ‘नार्को टेस्ट’ करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.