भुसावळ शहरातील डेली मार्केटमधील प्रकार: व्यापाऱ्यांसह नागरिक, वाहनधारकांचे प्रचंड हाल
भुसावळ: शहरातील डेली बाजारातील जवाहर डेअरीसमोर एका खाजगी रुग्णालयासाठी अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासाठी चारी खोदण्यात आल्याने आठवडे बाजारातील वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरीकांसह व्यापारी व वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. पालिका प्रशासन व वीज वितरण कंपनीने यासाठी चार्जेस आकारून परवानगी दिली असलीतरी गेल्या तीन दिवसांपासून रस्ता बंद ठेवण्यात आल्याने या भागातील व्यापार्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिस व पालिका प्रशासनाने नागरीक व व्यापार्यांची होणारी गळचेपी पाहता दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जवाहर डेअरीनजीक एका रुग्णालयाची उभारणी होत असून या रुग्णालयासाठी स्वतंत्र वीजपुरवठा घेण्यासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्यात येत आहे. संबंधितांनी त्यासाठी वीज वितरण कंपनीचे सुपरव्हीजन चार्जेस तसेच पालिकेचे रस्ता खोदण्यासंदर्भातील चार्जेस भरले आहेत. शिवाय गत महिन्यात परवानगी पालिकेने दिली असलीतरी पावसाळ्यामुळे काम करता न आल्याने मंगळवारी रात्री अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासाठी चारी खोदण्यात आली मात्र लागलीच काम होणे अपेक्षित असताना गुरुवार उलटूनही प्रत्यक्षात काम न झाल्याने डिस्को टॉवरकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने वाहनधारकांसह व्यापार्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे.
तीन दिवसांपासून वाहनधारक त्रस्त
वर्दळीच्या डेली मार्केट, आठवडे बाजार भागाकडे जाणार्या रस्त्यावरच चारी खोदण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परीणामी बाजारात येणार्या ग्राहकांना रीक्षाने सोडा पायीदेखील प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे शिवाय व्यापारीवर्गाची या भागात मोठ्या प्रमाणावर दुकाने असून त्यांनादेखील दुकानात माल आणणे वा बाहेर पाठवण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. पालिका व पोलिस प्रशासनाने याबाबत दखल घेवून तिढा सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृउबा सभापतींसह गटनेत्यांनी व्यक्त केला संताप
गुरुवारी सायंकाळी कृउबा सभापती सचिन चौधरी व जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी खोदलेल्या चारीची पाहणी करीत संताप व्यक्त केला. पालिकेच्या कारभाराविरुद्धही पदाधिकार्यांनी ताशेरे ओढले. चारी खोदताना मुख्य रस्ताही मध्यभागी खोदण्यात आला शिवाय अनेकांची नळ कनेक्शनही तुटल्याने पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सचिन चौधरी यांनी डॉ.नागला पेव्हर ब्लॉक तुटल्याने तेथे नवीन पेव्हर ब्लॉक बसवण्याची तसेच काँक्रिटने रस्ता तयार करण्याची सूचना नागरीकांसमक्ष केली.
नगरपालिकेच्या भूमिकेबाबतही साशंकता
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शहरातील श्री विसर्जन मार्गावरील सराफ बाजार भागातील अंडरग्राऊंड केबलसाठी परवानगी मिळवली असलीतरी पालिकेच्या ना हरकतमुळे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले होते तर दुसरीकडे खाजगी केबल टाकण्यासाठी पालिकेने लागलीच वर्दळीचा रस्ता खोदण्याची परवानगी दिलीच कशी? असा प्रश्नदेखील आता व्यापारी उपस्थित करीत आहेत. पालिकेच्या एकूणच भूमिकेविषयीदेखील आता व्यापारीवर्गातून साशंकता व्यक्त होत आहे.
केबल टाकण्यासाठी परवानगी -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, संबंधितानी पालिकेकडे अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी परवानगी मागितल्याने मागेच एका महिन्यांची परवानगी दिली होती मात्र पावसामुळे काम करता न आल्याने बुधवारी परवानगी वाढवून देण्यात आली तर संबंधितानी रस्ता खोदण्यासाठी पालिकेची रीतसर रक्कम भरली आहे. संबंधिताना तातडीने काम करण्याच्या सूचना करू,
असेही त्या म्हणाल्या.
आर्थिक व्यवहारातून परवानगी -सचिन चौधरी
कृउबा सभापती सचिन चौधरी म्हणाले की, एका दिवसात पालिकेत जन्म-मृत्यू दाखला मिळत नाही दुसरीकडे मात्र धनदांडग्यांना एकाच दिवसात पालिकेने परवानगी वाढवून दिली. या प्रकारामागे मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित रुग्णालयासाठी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने तेदेखील हटवण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगत अमृत योजनेमुळे शहराची पूर्णपणे वाट लागली असून खराब रस्त्यांमुळे डॉक्टरांचे मात्र चांगभले होत असल्याचे त्यांनी सांगत पालिका व सत्ताधार्यांवर टिका केली.
पालिकेने मनमानी केल्यास आंदोलन- उल्हास पगारे
अमृत योजनेसाठी रस्ता खोदण्यात येत असल्याचे सांगून नागरीकांची दिशाभूल करण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी परवानगी देण्यात आल्यानंतर एकाच दिवसात ती रीन्यू करण्यात आली याचाच अर्थ पैशांची मोठ्या प्रमाणावर देवाण-घेवाण झाल्यानंतर हे काम झाल्याची टिका जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी केली. पालिका प्रशासनाने मनमानी पद्धत्तीने कारभार केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही
त्यांनी दिला.