केरळचे पर्यटन महागात पडले, नोकरी जाण्याची भिती

0

पुणे । मे महिन्यात कुटुंबासह केरळचे पर्यटन करणे काही पुणेकर व पिंपरी-चिंचवडकरांना महागात पडले आहे. निपाह विषाणूच्या संसर्गाच्या भितीने काही कंपन्यांनी केरळ पर्यटनाहून कामावर परतलेल्या कर्मचार्‍यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या घटनेने उद्योग तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. कामावर येण्यास प्रतिबंध करण्याच्या आदेशवजा सूचना मिळाल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकीकडे अशाप्रकारचा अनुभव कामाच्या ठिकाणी आलेला असताना घाबरलेल्या कर्मचार्‍यांनी निपाहची भितीने वैद्यकीय चाचण्यासाठी करण्यासाठी धाव घेतली आहे. यातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणेकर तसेच काही पिंपरी चिंचवडमधील नागरिक उन्हाळी सुट्टीसाठी केरळ राज्यात सहकुटुंब गेले होते. पर्यटनाहून ते परतल्यानंतर अनेकांनी कामावर हजर होण्यास सुरूवात केली. मात्र, काही कंपन्यांच्या प्रमुखांनी संबंधित पर्यटक कर्मचार्‍यांना भेदभावाची वागणूक दिली, तर काही कंपन्यांमध्ये कामास येण्यास प्रतिबंध करण्यात आला. अशा बिकट स्थितीत अडकल्यानंतरही खरंच आपल्याला निपाहचा संसर्ग झाला आहे का, या भीतीने या पुणेकरांना ग्रासले आहे. काही कर्मचार्‍यांनी थेट शहरातील प्रतिष्ठित डायग्नोस्टिक लॅबमध्ये जाऊन तपासणी करून घेतली. त्यांचा हा अनुभव ऐकल्यानंतर संबंधित पॅथॉलॉजिस्टनादेखील आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यांनीच ही बाब आरोग्य खात्याला कळविली. तसेच कर्मचार्‍यांना येत असलेले अनुभव कथन करण्यात आले. या प्रकाराची आरोग्य खात्याने गांभीर्याने दखल घेतली आहे.

निपाहच्या आजारांसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन राज्याच्या आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे. केरळमध्ये निपाहच्या विषाणूंचा संसर्ग होत आहे. परंतु, त्या विषाणूचा महाराष्ट्रातील जनतेला धोका नाही. आजाराच्या विषाणूसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये, असे आरोग्य खात्यासह राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु, भीती दूर होण्याऐवजी शिक्षित असलेल्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांमध्येच याबाबत अज्ञान असल्याचा प्रत्यय आला आहे. त्याचा फटका केरळहून पर्यटन करून आलेल्या काही कर्मचार्‍यांना बसला आहे.