केरळच्या मदतीसाठी अमळनेरकरही सरसावले

0

नियोजनासाठी मंगळवारी बैठक, माजी आ डॉ बी एस पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन

अमळनेर-निसर्गाच्या कोपामुळे सम्पूर्ण केरळ राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी, मालमत्ता हानी झाली असून मानवतावादी दृष्टीकोनातून तेथील पीडितांना अमळनेर परिसरातुनही मदत व्हावी, या दृष्टीकोनातून नियोजन करण्यासाठी अमळनेर येथे बैठकीचे मंगळवार 21 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वा आयोजन करण्यात आले आहे. महाराणा प्रताप चौकाजवळील जि प विश्राम गृह येथे ही बैठक होणार असून माहिती माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी दिली आहे.

सर्व पक्षीय पदाधिकारी, नेत्यांची उपस्थिती
केरळ राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले असून अश्या परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी केंद्र शासन व इतर राज्ये आपआपल्या परीने मदत देत आहेत. त्यात अमळनेर करांचाही खारीचा वाटा असावा या दृष्टीने सर्वानीच पुढे यावे, अशी अपेक्षा डॉ पाटील यांनी व्यक्त केली आहे व वस्तूंच्या गरजेपेक्षा आर्थिक मदत देणे महत्वाचे असल्याने ती कशी करता येईल याचेच नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत सर्व राजकीय पक्षांचे नेते, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, वकील संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, विविध डॉक्टर्स, पदाधिकारी, क्लब पदाधिकारी, सर्व संघटना व मंडळाचे पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी, व्यापारी संघटना पदाधिकारी, शिक्षक संघटना, शेतकरी संघटना, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, नोकरदार वर्ग, कामगार संघटना पदाधिकारी, उद्योगपती, बिल्डर्स, दानशूर व्यक्ती,इतर व्यावसायीक संघटना, खाजगी कोचिंग कलासेस संघटना, वाहन संघटना, पत्रकार संघटना यासह इतर इच्छुकांनी सदर बैठकीत आवर्जून उपस्थिती देऊन या मानवतावादी उपक्रमास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. बी. एस. पाटील यांनी केले आहे.