केरळमधील पुरग्रस्तांसाठी जैन उद्योग समूहाचा मदतीचा हात

0

दीड कोटीचे मसाले आणि फळयुक्त आहाराचे कंटेनर रवाना

जळगाव-देवभूमी केरळ मध्ये वादळी पावसाने गेल्या काही दिवसांपासुन धुमाकुळ घातला आहे. वादळीपावसामुळे निम्म्याहून अधिक केरळ राज्याची मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांची वानवा निर्माण झाली आहे. केरळ मधील नागरिकांना मानवतावादी मुल्यातून मदतीचा हात देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ने पुढाकार घेतला आहे.
जैन इरिगेशनच्या माध्यमातून जैन फार्मफ्रेश फुडस लि. आणि भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडशनव्दारे जवळपास दीड कोटी रुपये मुल्याचे निर्जलिकृत कांदे, मसाले व फ्रुट टु गो हा फळयुक्त आहार असे एक लाख किलो खाद्यपदार्थ पाठवले जाणार आहे.

बुधवारी रात्री एर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेस मधून 20,000 किलो मसाले भरलेली एक वॅगन पाठवण्यात आली. 22,000 किलो निर्जलिकृत कांदे भरलेली दुसरी वॅगन आज पाठवण्यात येईल. आणि त्यानंतर उद्या आणि परवा पर्यंत आणखी 3 वॅगन्स भरून खाद्यपदार्थ पाठविले जातील. सदर साहित्य पाठविण्यासाठी रेल्वे विभागाने ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. केरळमधील पुरग्रस्तांना वॅगन पाठवण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जैन फार्मफ्रेश फुडस लि.चे सहकारी तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.