कन्नूर- केरळमधील कन्नूर जिल्ह्यात सीपीआय(एम)चे आमदार ए.एन.शमसीर यांच्या निवासस्थानावर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन हिंसाचार झाला असतानाच ही घटना घडली आहे. बॉम्ब हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हल्ल्यावेळी आमदार शमसीर हे घरात नव्हते. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शमसीर यांनी या हल्ल्यामागे आरएसएसच्या मोठ्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये थलासेरीमध्ये आरएसएस आणि सीपीआय-एम नेत्यांच्या निवासस्थानी बॉम्ब हल्ल्याच्या घटना घडत आहेत. शमसीर हे थलासेरी मतदार संघातून निवडून आले आहेत.
शुक्रवारीच मंदिर प्रशासनाचे सदस्य शशिकुमार यांच्यावरही बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. आरएसएस आणि सीपीआय(एम)च्या कार्यकर्त्यांमध्ये येथे सातत्याने संघर्ष सुरू आहे.