केर्बरला पहिल्याच फेरीत धक्का!

0

पॅरिस । फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल लागला. जागतिक अग्रमानांकित अँजेलिक केर्बरला स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. रशियाच्या एकतेरिना माकारोव्हाने तिचे आव्हान पहिल्याच लढतीत संपुष्टात आणले. दुखापतीतून सावरल्यानंतर झेकच्या पेत्र क्विटोव्हाने मात्र विजयी पुनरागमन करून दुसर्‍या फेरीत स्थान मिळविले. याशिवाय कुझनेत्सोव्हा, शेल्बी रॉजर्स यांनीही विजय मिळविले तर रॉबर्टा व्हिन्सीचे आव्हान समाप्त झाले. जर्मनीच्या केर्बरला माकारोव्हाने 6-2, 6-2 असे सहज पराभूत केले. 1968 मध्ये टेनिसला व्यावसायिक स्वरूप आल्यानंतर अग्रमानांकित खेळाडू या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

डिसेंबरमध्ये चोराच्या चाकू हल्ल्यात जखमी झाल्यानंतर बराच काळ टेनिसपासून दूर रहावे लागलेल्या झेकच्या क्विटोव्हाने विजयी पुनरागमन करीत या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. विम्बल्डनचे दोनदा जेतेपद मिळविलेल्या क्विटोव्हाने अमेरिकेच्या ज्युलिया बोसरुपचा 6-3, 6-2 असा पराभव केला. चाकू हल्ल्यात दुखापत झालेला डाव हात अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नसून अजूनही वेदना होत असल्याचे तिने सांगितले. एका क्रॉसकोर्ट फोरहँडवर तिने हा सामना संपवला.2012 मध्ये तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तिची पुढील लढत बेथनी मॅटेक सँड्स किंवा एवगेनी रोडिना यापैकी एकीशी होईल.