केर्‍हाळेत सत्संग मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे

0

गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे साधणार भाविकांशी हितगुज

रावेर- श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे शिल्पकार आणि दिंडोरी प्रणित सेवामार्गाचे प्रमुख प.पू.यांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील केर्‍हाळे येथे मंगळवार, 8 मे रोजी भव्य शेतकरी सत्संग मेळावा होत आहे. मेळाव्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. आरोग्य शिबीर व कृषी विषयक मार्गदर्शन प्रसंगी करण्यात येणार आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून बळीराजाला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आधुनिक शेतीशास्त्र तंत्र, सेंद्रिय शेती, कोरडवाहू शेती, शेतीचे वास्तुशास्त्र, पर्जन्यदेवतेची उपासना तसेच आयुर्वेद, अध्यात्म, वास्तुशास्त्र, मानवी जीवनातील विविध समस्या, गुरूप्रणाली अंतर्गत ग्रामअभियान, स्वयंरोजगार अशा अनेक मार्गातील विविध विषयांव्दारे प.पू. अण्णासाहेब मोरे मार्गदर्शन व हितगुज करणार आहेत. मानवी कल्याणासाठी आज हजारो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रे महाराष्ट्र राज्यासह भारतभर तसेच परदेशातही स्थापन करण्यात आली आहेत.

अण्णासाहेब मोरे भाविकांशी करणार हितगुज
शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून भारतातील शेतकरी सुखी, समाधानी व्हावा तसेच संपुर्ण मानवजात आनंदीत नांदावी यासाठी या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 8 मे रोजी दु.4.30 ते 6 या वेळेत श्री दुर्गा सप्तशक्ती पाठ, सायंकाळी 6 ते 8.30 पर्यंत प.पू.गुरूमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे हितगुजचा लाभ या मेळाव्यात होणार आहे. केर्‍हाळे येथील महामेळाव्याबाबत तयारी पूर्णत्वास आली आहे. केर्‍हाळे येथील सावित्रीबाई दत्तु पाटील मंगल कार्यालय शेजारील जागेवर होणार्‍या या मेळाव्यासाठी सेवेकरी, केंद्र प्रतिनिधी, राज्यातुन व राज्याबाहेरील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने, ग्रामस्थ, परीसरातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. प.पू. गुरूमाऊलींच्या विचारांचे सिंचन आपण आत्मसात करून आपले जीवन उन्नत करावे तसेच मोठ्या संख्येने सहभागी होण्याचेही आवाहन के-हाळे ग्रामस्थ व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राव्दारे करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य शिबिर होणार असून रुग्णांची तपासणी गुरूकुल पीठ त्र्यंबकेश्वर व दिंडोरी दरबार येथून येणार्‍या वैद्यकीय पथकाव्दारे केली जाणार आहे.