आमदार हरिभाऊ जावळे यांची विधानसभेत मागणी
नागपूर:- पावसामुळे खान्देशात विशेषतः रावेर परिसरात केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रावेर परिसरात १२०० हेक्टर क्षेत्रात १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जावळे यांनी दिली. यामुळे केली उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना देखील भेटून विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार जावळे म्हणाले कि, रावेरच्या शेजारीच असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील जिल्ह्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी १ लाख रुपये हेक्टरी मदत दिली आहे. सोबतच इलेक्ट्रिक बिल माफ केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीने मदत घोषित करावी अशी मागणी त्यांनी केली. फलोत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. यामध्ये महत्वाचे फळ असलेले केळीचे उत्पादन रावेर परिसरात मोठ्या प्रमाणात होते. केळीचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात लवकर मदत द्यावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
