केळीवरील चरक्याची शास्त्रज्ञांसह कृषी अधिकार्‍यांकडून पाहणी

0

प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्‍यांना दिला सल्ला ; रावेर तालुक्यात थंडीचे तापमान घसल्याने केळीला फटका

रावेर- तालुक्यात 10 सेल्सिअसपेक्षा तापमान कमी झाल्याने केळीवर चरका रोगाची लागण झाल्याने पाहणीसाठी गुरूवारी जळगाव येथील कृषी शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकार्‍यांनी टीमसह रावेर तालुक्यात पाहणी केली तसेच शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसर करून उपाययोजनेबाबत माहितीही दिली. तालुक्यातील सावदा, वाघोदा बु.॥, चिनावल, कुंभारखेडा, भातखेडा, उटखेडा भागात टीमने पाहणी केली.

तापमान घसरल्याने केळीला फटका
तालुक्यातील सुमारे 20 हजार हेक्टरवर केळीची दरवर्षी लागवड होते. त्यात नऊ हजार हेक्टर जुनी केळी व 11 हजार हेक्टरवर नवीन केळीची लागवड केली जाते. डिसेंबरमध्ये सतत 10 ते 12 दिवस तापमान 10 सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यामुळे केळीच्या झाडांचे मुळांव्दारे अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्रीया प्रचंड मंदावली व अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे केळी पाने पिवळसर पडून चरक्याची लागण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाधीत क्षेत्राची यांनी केली पाहणी
जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.के.बी.पवार, तालुका कृषी अधिकारी एस.एस.पवार, विभागी मंडळ कृषी अधिकारी एस.आर.साळुंखे, एस.पी.गायकवाड, चंपालाल वारडे, पी.जी.पाटील, राजपूत,श्र रुले यांच्या टीमने केळी बागांची पाहणी केली.

चरक्यावर या आहेत उपाययोजना
थंडीपासून केळीच्या संरक्षणासाठी शेतकर्‍यांनी चारही बाजूने शेडनेट लावावे, केळीच्या चारही बाजूंनी रात्री वाळलेला व ओला कचर्‍याचा धूर करावा, रात्री केळीला पाणी द्यावे यामुळे तापमानात वाढ होईल तसेच खोडा भोवती 500 ग्रॅम निंबोळी पेंड कोल्या घेऊन टाकावी, बागेस 19-19-19 या विद्राव्य खताची 75 ग्रॅम प्रति 15 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी, चिलेटेड स्वरुपातील सुक्ष्म अन्नद्रव्ये 200 ग्रॅम प्रति 1000 झाडास ठिबकव्दारे द्यावीत किंवा फवारणी करावी, पोटॅशची मात्रा कमी पडणार याची काळजी घ्यावी, मोठ्या बागेस प्रति एक झाडास युरीया पाच किलो अधिक अमोनियम सल्फेट ती किलो अधिक पोटॅश पाच किलो दर चार-पाच दिवसांच्या अंतराने द्यावेत, केळी घडावर स्कटींग बॅग लावावी यापुढील काळात करप्याचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रोटीनीझॉल एक मिली प्रति लिटर त्यासोबत मिनरल ऑईल 10 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.